कोल्हापूर : चित्रपटाविषयी बालकांमध्ये सजग जाणीव निर्माण करणाऱ्या चिल्लर पार्टी चळवळीने बाराव्या वर्धापनदिनानिमित्त शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम वाड्यावस्त्यांमधील १४ शाळांमधील ३९० शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी येथील शाहू स्मारक भवनात मोठ्या पडद्यावर प्रथमच बालचित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते . या मुलांना राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ, गंगाराम कांबळे स्मारक आणि टाउन हॉल बागेतील वस्तुसंग्रहालय दाखवले.
पहिल्यांदाच अशी अनुभूती घेणाऱ्या वाड्या वस्तीवरील मुलांच्या आनंदाला उधाण आले होते. शाहू स्मारक भवन येथे शाहुवाडी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी १४ शाळांमध्ये ग्रंथालय सुरु करण्यासाठी चिल्लर पार्टीतर्फे १० पुस्तकांचा संच आणि वह्या भेट देउन सहभागी शाळांचे स्वागत केले.
हेही वाचा…शाहू विचार दर्शन पदयात्रेद्वारा विविधांगी कार्याचा जागर
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभाग प्रमुख डॉ. भगवान हिर्डेकर, प्राचार्य डॉ. प्रविण चौगुले, चंद्रकांत निकाडे, प्रा. दीपक भोसले उपस्थित होते. प्रतिक्षा पिंगळे आणि समीक्षा बोटांगळे या विद्यार्थिनींनी चिल्लर पार्टीचे आभार मानले. यावेळी योगेश पिंगळे, संदीप पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले. चिल्लर पार्टी चांगला माणूस बनण्याचे शिक्षण देत आहे, या संस्कारातून मुलांनी मोठी रेघ बनण्याचा प्रयत्न करावा,अशी अपेक्षा यावेळी विश्वास सुतार यांनी व्यक्त केली.
मिलिंद यादव यांनी सूत्रसंचालन केले. सलीम महालकरी यांनी आभार मानले. मुलांनी ‘गॉड्स मस्ट बी क्रेझी २’ या सिनेमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे नियोजन मिलिंद नाईक,ओंकार कांबळे, चंद्रशेखर तुदिगाल, नसीम यादव, देविका बकरे, सुधाकर सावंत, मिलिंद कोपार्डेकर, विजय शिंदे, शैलेश चव्हाण, डॉ. शशिकांत कुंभार, महेश नेर्लीकर, अभय बकरे, शिवप्रभा लाड, गुलाबराव देशमुख, रविंद्र शिंदे यांनी केले.
हेही वाचा…ओबीसी आरक्षणाला धोका! मुस्लिमांसाठीचे कर्नाटक प्रारूप लागू करण्याचा काँग्रेसचा डाव : मोदी
१४ वाड्या वस्त्या सहभागी
या कार्यक्रमात जिल्ह्यातील निळे, माण, वारुळ, नांदगाव, परळी, घुंगूर, कोनोली तर्फ असंडोली, गुजरवाडी, बुरंबाळ, कांटे, बरकी, अणुस्कुरा, शिराळे आणि भेडसगाव या वाड्यावस्त्यांतील शाळा सहभागी झाल्या. सर्वांना ‘सिनेमा पोरांचा’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
हेही वाचा…पाच वर्षात पाच पंतप्रधान देण्याची काँग्रेसची नीती देशातील जनता सहन करणार नाही – नरेंद्र मोदी
प्रतीक्षा पिंगळेचा खास सत्कार
पिंगळे धनगरवाडा येथे पहिली ते चौथी शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी साडे तीन किलोमीटर जंगलातून निळे गावापर्यंत चालत अतिशय कष्टप्रद वातावरणात पुढे मलकापूर येथे जाउन या गावच्या प्रतीक्षा पिंगळे हिने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. ती या गावची पहिली बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनी आहे. या विदयार्थिनीचा सुतार यांच्या हस्ते पुस्तकाचा संच भेट देउन खास सत्कार करण्यात आला. पुढील शिक्षण शहरात घेणार असल्यास चिल्लर पार्टी तिला मदत करेल असे मिलिंद यादव यांनी सांगितले.