कोल्हापूर : दौलत- अथर्व साखर कारखान्यातील व्यवस्थापन व कामगार यांच्यात सोमवारी पुन्हा संघर्ष उफाळून आला. यातून वाद निर्माण झाल्याने जोरदार दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला.
कामगारांच्या ३५ दिवसांच्या संपानंतर अथर्व संचलित दौलत साखर कारखाना सुरळीत सुरू होणार असे वाटत होते. आज अथर्व व्यवस्थापन व कामगार यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. सकाळी दौलतच्या गेटवर कामगार व व्यवस्थापन यांच्या संघर्ष होऊन किरकोळ जोरदार दगडफेक झाली. यात कारखान्याच्या ऑफिसच्या काचा फुटल्या. कामगार व्यवस्थापन यांच्यात मतभेद झाल्याने याची तालुकाभर चर्चा सुरू झाली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्याचे लक्ष पुन्हा एकदा दौलत कडे लागून राहिले आहे.
याबाबत अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी, कामगारांची सर्व देय रक्कम देण्यासाठी पाच कोटी रुपये लागत आहेत. बोनस स्वरूपात तीन पगारांची मागणी कामगार करत असून ती मागणी मान्य करणे शक्य नाही. ३० ते ४० कामगार कारखाना बंद पाडण्यासाठी सुपारी घेतली असल्यासारखे वागत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. दहशत माजवून कारखाना बंद पडणाऱ्या कामगारांवर निलंबनाची कार्यवाही सुरू करणार आहे,असा इशारा दिला. कामगार संघटनेचे प्रदीप पवार यांनी उसाच्या तोडी देऊन व्यवस्थापन कामगार आणि शेतकरी यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अजूनही कामगारांना शिवीगाळ करण्याचे प्रकार सुरू आहेत. बोनस मागणी हा आमचा हक्क आहे. कामगारांमध्ये फूट पाडण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे,असा आरोप केला.