लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची नळावरील भांडणे नेहमीच चर्चेत असतात. पण एखाद्या नळपाणी योजनेसाठी दोन गावातील महिलांनी एकमेकांविरोधात पदर खोचून लढण्याचा प्रकार बहुधा प्रथमच इचलकरंजी विरुद्ध कागल तालुका असा घडत आहे.
इचलकरंजी महापालिकेच्या दूधगंगा नळपाणी योजनेचे काम गतीनेव्हावे यासाठी ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या संघटनेच्या माध्यमातून चार दिवस महिलांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडे पाणी योजनेबाबत बैठक घेतील असे पत्र वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर काळ उपोषणाची सांगता झाली. पाठोपाठ आज इचलकरंजी नळपाणी योजना कायमस्वरूपी रद्द करावी यासाठी सोमवारपासून कागल तालुक्यातील दुधगंगा बचाव कृती समिती ‘आम्ही जिजाऊ च्या लेकी’ च्यावतीने सुळकूड येथील नदी बंधाऱ्यावर बेमुदत सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना आंदोलक महिलांनी शुक्रवारी सादर केले.
आणखी वाचा-कोल्हापूर : बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहार प्रकरणांच्या चौकशीसाठी मंगळवारी मोर्चा
या निवेदनात म्हटले आहे की,काळम्मावाडी धरणामध्ये पिण्यासाठी पाणी ६.३९ टीएमसी आहे. पाण्याचा वापर पाहता ते धरणात आता शिल्लक राहत नाही. त्यातच ४२ ग्रामपंचायती विना परवाना पाण्याचा उपसा करीत असून त्यांची परवाना नोंदणी झाल्यानंतर धरणात पिण्यासाठी पाणीच शिल्लक राहणार नाही.
खोडसाळ वृत्तीतून योजनेला मान्यता
मुळातच इचलकरंजी पाईपलाईनला मंजुरी देताना या नदीकाठावरील नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे इचलकरंजीकरांची मागणी अत्यंत चुकीची आहे. दुधगंगा काठावरील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची पूर्तता झालेली नसताना या गोष्टींचा गांभीर्यपुर्वक विचार न करता कोणाच्यातरी खोडसाळ वृत्तीतून इचलकरंजी दूधगंगा पाणी योजनेला मान्यता दिली गेली.
आणखी वाचा-“लोकसभेसाठी दोन, तर विधानसभेसाठी १५ जागा मिळाव्यात”, जोगेंद्र कवाडे यांची महायुतीकडे मागणी
शेतीला पाणी कमी
त्यामध्येच या धरणाला मोठ्या प्रमाणात असणारी गळती मुळे पूर्ण क्षमतेने न होणारा पाणी साठा व पाऊसाचा लहरीपणा यामुळे या नदीवर अवलंबून असणा-या धरणक्षेञातील शेतकरी व गावे यांनाच पाणी कमी पडत आहे.त्यामुळे या योजनेला येथील दुधगंगा, वेदगंगा नदीकाठावर नागरिकांचा विरोध आहे.
योजना रद्द हाच एकमेव पर्याय
याबाबत या पूर्वी या योजनेविरोधात शासनाला अनेक निवेदने दिली आहेत.तसेच तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावरती प्रचंड संख्येने मोर्चे काढले आहेत.हा सर्व विरोध लक्षात घेऊन शासनाने ही योजना रद्द केल्याचे घोषित करणे हा एकमेव पर्याय आहे. या योजनेला दुधगंगा, वेदगंगा नदीकाठावर नागरिकांचा विरोध असून सोमवार पासून सुळकूड धरणावर महिला उपोषणाला बसणार आहेत. कागल पंचायत समितीच्या माजी सभापती राजश्री माने,मनिषा सरदार,सरपंच वीरश्री जाधव आदींनी निवेदन दिले आहे.