इचलकरंजी शहराच्या विकासाचा घट बसवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतला असून यामुळे वस्त्रनगरीतील दसरा-दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी पायाभूत विकास सुविधांची योजना म्हणून ५७६ कोटी रुपये खर्चाच्या काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प ‘अमृत’ योजनेत विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्याचा, इंदिरा गांधी हॉस्पीटलला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याचा आणि शहरास भरघोस विशेष रस्ते अनुदान देण्याच्या निर्णयाचा तिहेरी बार मुख्यमंत्र्यांनी उडविला.
इचलकरंजी शहरास काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा, आयजीएम हॉस्पीटलचे शासनाकडे हस्तांतरण आणि शहरास विशेष रस्ते अनुदान देणे या तीन विषयांबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात सुमारे तासभर बठक पार पडली.
हाळवणकर यांनी पाण्याचे सर्व स्त्रोत प्रदूषित झाल्यामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेची गरज विशद केली. या योजनेसाठी आपण ४ वष्रे पाठपुरावा  करत असल्याचे आ. हाळवणकर यांनी सांगितले. मात्र प्रधान सचिव म्हैसकर यांनी योजनेच्या खर्चावर आक्षेप घेतला, तसेच येत्या ३-४ वर्षांत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यावर भर देण्याचा उपाय सुचविला. मात्र इचलकरंजी शहरात काविळ साथीमुळे ५० लोकांचे बळी गेल्यामुळे विशेष बाब म्हणून या योजनेस मंजुरी देण्याची विनंती  हाळवणकर यांनी केली. त्यावर फडणवीस यांनी हा प्रकल्प इचलकरंजी नगरपालिकेने खासगी मक्तेदारामार्फत तयार करण्यात आला असल्यामुळे खर्चाचे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत परीक्षण करून येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत मान्यता देण्याचा व अमृत योजनेतून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याचा निर्णय जाहीर केला.
नगरपालिकेने ३५० बेडचे उभारलेल्या आय.जी.एम रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देऊन निधी द्यावा, अशी मागणी हाळवणकर यांनी केली. राज्यातील सर्वच रूग्णालयांचे असे प्रस्ताव येत असल्यामुळे शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले. त्यास विलंब लागणार असल्याने विशेष बाब म्हणून निर्णय घेण्याची विनंती हाळवणकर यांनी केल्याने फडणवीस यांनी इचलकरंजीचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून एका महिन्यात कॅबीनेट समोर सादर करण्याचा आदेश दिला.
जिल्ह्यातील सर्वात मोठी योजना
कोल्हापूर शहरासाठी काळम्मावाडी धरणातील पाणी पुरवठा करणारा ४५० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प ही जिल्ह्यातील सर्वात मोठी योजना होती. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी इचलकरंजी शहरासाठी ५७६ कोटी रुपये खर्चाच्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून ही योजना जिल्ह्यातील पायाभूत विकास सुविधांची सर्वात मोठी योजना ठरली आहे.

Story img Loader