कोल्हापूर : राज्याचे नवे वस्त्रोद्योग धोरण अमलात येत आहे. त्यातील तरतुदीनुसार साध्या यंत्रमागासाठी १ रुपये व २७ अश्वशक्तीवरील आधुनिक मागासाठी ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलतीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कोरोची येथे बोलताना केली. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जात असून ज्या भागात ही सवलत लागू नाही तेथेही ती सवलत लागू केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलांचे विराट दर्शन

हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावात आज राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान आयोजित केले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासन मिळून डबल इंजिनचे काम करीत आहे. देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे. अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी महिला सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल घडविणारे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आहे. त्यामुळे आज महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांचे विराट दर्शन होत आहे.

हेही वाचा – कोल्हापूरच्या आखाड्यात निवडणुकीपूर्वीच खडाखडी सुरू

महापूर, प्रदूषणाकडे लक्ष

कोल्हापुरात महापुराचा त्रास टाळण्यासाठी जागतीक बँकेच्या सहकार्याने ३२०० कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ७५० कोटींचा प्रस्ताव तयार केला असून दूषित पाणी रोखण्यासाठी आवश्यक ठिकाणी एसटीपी बांधण्यात येणार आहेत. कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत २०० पट वाढ केली आहे. त्याला येथूनच आज मी स्थगिती देत आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – “२६ जुलैच्या पुरात वडिलांना सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये…”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. खासदार धैर्यशील माने यांनी विविध प्रलंबित मागण्या मांडल्या. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण झाले. खासदार संजय मंडलीक, धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, समरजीत घाटगे, मनिषा कायंदे, महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, राहूल आवाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde korochi kolhapur announced the implementation of power tariff concession for power looms ssb
Show comments