कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या दूधगंगा सुळकुड योजनेस संदर्भातील शंकांचे निरसन सर्वांच्या मदतीने मिळून करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी प्रयत्नशील आहे, असे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेवर देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार जयंत पाटील यांनी इचलकरंजी महापालिकेच्या सुळकुड नळ पाणी योजनेबाबतचा बाबतची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती. औद्योगिक शहर असलेल्या इचलकरंजीला तीन-चार दिवसात पाणीपुरवठा होत असतो. त्यासाठी तत्कालीन शासनाने १८ जून २०२० रोजी सुळकुड  योजनेस मंजुरी दिली आहे. मात्र अद्याप या कामास सुरुवात न झाल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली आहे, अशी विचारणा त्यांनी केली होती.

हेही वाचा >>> सांगलीत कॉंग्रेसचा जल्लोष

या लक्षवेधी सूचनेवर वेळेअभावी चर्चा झाली नाही. लेखी उत्तर सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले त्यावर मुख्यमंत्री यांच्या वतीने निवेदन करण्यात आले.  त्यामध्ये म्हटले आहे की, इचलकरंजी शहरासाठी पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना असून ४५ दशलक्ष लिटर पाणी जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचते. लोकसंख्येच्या मानाने योजना अपुरी असल्याने केंद्र पुरस्कृत अमृत योजनेतून १६० कोटी किमतीच्या सुळकुड  पाणीपुरवठा योजनेत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे अध्यक्षतेखाली २९  जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीमध्ये दूधगंगा लाभ क्षेत्रातील शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी विरोध करून योजना रद्द करण्याची मागणी केली. तथापि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी या योजनेच्या संदर्भात असणाऱ्या शंकांचे निरसन सर्वांच्या मदतीने मिळून करण्याचे विशद केले. सद्यस्थितीत या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची कार्यवाही महापालिका स्तरावर सुरू आहे, असे उत्तर देण्यात आले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collector trying to implement ichalkaranji water scheme chief minister eknath shinde ysh