सोलापूरचे धडाकेबाज जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी म्हणून पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह सर्वपक्षीय वजनदार लोकप्रतिनिधी व बलाढ्य पुढाऱ्यांनी प्रयत्न चालविले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांची जोरदार पाठराखण केली आहे. त्यामुळे मुंढे यांची खुंटी आणखी बळकट झाली आहे.
अतिशय कार्यक्षम आणि धडाकेबाज तथा पारदर्शी आणि कडक शिस्तीचे असे तुकाराम मुंढे हे गेल्या एक वर्षांपासून सोलापुरात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडला नसताना पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित झाला. परंतु जिल्हाधिकारी मुंढे यांनी टँकरचा पर्याय टाळून अन्य पर्याय कृतीत आणले. त्यामुळे टँकरलॉबी तथा त्यांचे पाठीराखे पुढारी मुंढे यांच्या विरोधात भूमिका घेत होते. त्याचवेळी जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा दूर होण्यासाठी मुंढे यांनी राबविलेले जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण राज्यात अग्रेसर ठरत आहे. त्याचे दृश्य परिणाम लवकरच दिसतील, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.
पंढरपूरच्या आषाढी यात्रेचे सर्वोत्कृष्ट नियोजन केल्याने यात्रेत कोठेही अस्वस्थता दिसून आली नाही. पंढरपूर यात्रेचा ‘तुकाराम पँटर्न’ म्हणून जिल्हाधिकारी मुंढे यांची ऐतिहासिक कामगिरी पुढे आली. शेतीसाठी विशेषत ऊस पिकासाठी होणारा पाण्याचा प्रचंड अपव्यय मुंढे यांनी प्रयत्नपूर्वक रोखला. महसूल खात्यात शिस्त आणली. महसूल खात्याप्रमाणे अन्य सर्व खात्यांमध्ये शिस्त आणण्याचे काम मुंढे यांनी केले. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना मुंढे हे राजकीय पुढाऱ्यांपेक्षा सामान्य माणसाचे हित जपताना दिसून येतात. त्यामुळे मुंढे हे अल्पावधीतच लोकप्रिय ठरले आहेत.
या पाश्र्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून मुंढे यांच्या बदलीचा घाट घातला जात आहे. स्वत पालकमंत्री विजय देशमुख हेच जिल्हाधिकारी मुंढे हे आपणांस विश्वासात घेत नाहीत, सांगितलेली कामे करीत नाहीत म्हणून नाराज आहेत. परंतु मुंढे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खास विश्वासातील अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांच्या सोलापुरातील कारकीर्दीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यातूनच त्यांची उचलबांगडी होणार म्हणून चर्चा सुरू आहे. यासंदर्भात सोलापूर भेटीत स्वत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी मुंढे यांची जोरदार पाठराखण केली. स्वत मुंढे यांनी जरी बदलीची मागणी केली, तरी त्यांना बदलणार नाही, अशा स्वच्छ शब्दात मुख्यमंत्र्यांनी निर्वाळा दिला आहे.
जिल्हाधिकारी मुंढेंची मुख्यमंत्र्यांनी केली पाठराखण
अतिशय कार्यक्षम आणि धडाकेबाज तथा पारदर्शी आणि कडक शिस्तीचे असे तुकाराम मुंढे हे ...
आणखी वाचा
First published on: 26-11-2015 at 03:38 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collector tukaram mundhe supporting chief minister