लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्याकडील प्रशासक पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. प्रशासक पदी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयानंतर दिवटे यांनी अन्यत्र बदली करून घेण्याच्या हालचाली गुरुवारी सुरू केल्या होत्या.
इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकपदी दिवटे यांची सहा जुलै २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. माजी आमदार प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांचे दिवटे यांच्यात मतभेद वाढल्याच्या राजकारणाची परिणती म्हणून पदभार काढून घेण्यात आल्याची चर्चा आहे.
मॅट तक्रार मागे – दिवटे
इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती हा शासनाचा निर्णय आहे. त्याबद्दल मला कोणाबद्दल रोष असण्याचे कारणच नाही. बदली संदर्भात मॅटमध्ये केलेली तक्रार मागे घेण्याबाबत मी लेखी कळविले आहे. त्याचबरोबर अन्य ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळावी, अशी शासनाकडे मागणी केली असल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
विकासकामांवर भर
ते म्हणाले, नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर आर्थिक घडी नीट बसविण्यासाठी नेटके प्रयत्न केले. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ३८ एमएलडी क्षमतेच्या एसटीपी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. ४८८ कोटी रुपये खर्चाचे आणखी दोन एसटीपी प्रकल्प उभारणीचे काम सुरू होईल. रस्ते, विविध सहा ठिकाणी नवीन जलकुंभ, स्टॉर्म वॉटर प्रणाली, ई-बस सेवा यासाठी प्रयत्न केले आहेत.