विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेनेतील दोन गटातील संघर्ष शिगेला पोहोचला. गुरुवारी सायंकाळी एका भेटीच्या निमित्ताने दानवे यांना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक असले प्रकार खपवून घेत नाहीत असे म्हणत दानवे यांनी त्यांना उत्तर दिले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने एकच तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा >>> कोल्हापूरच्या सुपुत्राची युनायटेड किंग्डम सरकारच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती
दानवे यांच्या जनता दरबारात एका तक्रारीच्या निमित्ताने वातावरण तापले होते. क्षीरसागर यांच्या शेजारी राहणारे वरपे कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार करूनही कसलीही कारवाई होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. त्यावर दानवे यांनी कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांना फोन राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केली असताना त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा केली. शिवाय, तुमची आणि राजेश क्षीरसागर यांची मस्ती अजिबात चालणार नाही, गुन्हा दाखल करा, असे सुनावले.
हेही वाचा >>> “महाराष्ट्र हे गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले आहे”, अंबादास दानवे यांची कोल्हापुरात टीका
आपल्या विरोधात दानवे यांनी एकेरी भाषा वापरल्याने क्षीरसागर संतप्त झाले होते. वरपे यांच्या भेटीला दानवे सायंकाळी जाणार होते. तत्पूर्वी क्षीरसागर समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात घोषणा पाहिजे सुरू केली. मागीलदाराने विधान परिषदेत गेलेले अंबादास दानवे यांना समाजमनाची माहिती नाही. सावकारी करणारे वर्पे यांची बाजू घेऊन ते पोलिसात तक्रार करतात हे अशोभनीय आहे ,अशी टीका क्षीरसागर यांनी केली. क्षीरसागर यांनी जमाव जमावल्याचे लक्षात आल्यानंतर दानवे यांनी त्यांनी १०० माणसे जमावावित की दोन हजार. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. न घाबरता तेथे जाणारच ,असा निर्धार केला. दानवे तेथे पोहोचले तेव्हा पुन्हा जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. तणावपूर्ण वातावरणात पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.