ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांची २४ नोव्हेंबर रोजी जयंती संघर्ष यात्रा व निर्धार सभा होणार आहे. या दिवशी राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल होणार असून, सागरमाळ येथील पानसरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ जमून निर्धार शपथ घेणार आहेत, तसेच पानसरे यांच्या घरासमोर निर्धार व्यक्त करणार असल्याची माहिती भाकपचे नामदेव गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गावडे म्हणाले, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे पाठोपाठ खून झाले तरी मारेकरी अद्याप सापडत नाहीत. तीन खुनानंतरही पुरोगामी कार्यकर्त्यांना धमकीची पत्रे येत आहेत. सनातनचा साधक समीर गायकवाड याच्या विरुद्ध अद्यापही दोषारोपपत्र दाखल झाले नाही. चौकशीही अद्याप पूर्ण होत नाही, यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलीस यंत्रणा व तपासाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे खूनसत्र थांबावे, सनातन संस्थेवर कारवाई करावी, या मागणीसाठी पानसरे यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांचे दोन जथ्थे कोल्हापुरात येणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी पुण्याहून संघर्ष यात्रा निघणार आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर, भालचंद्र कानगो, अशोक ढवळे, भारत पाटणकर, मिलिंद रानडे सहभागी असणार आहेत. तर दुसरा जथ्था ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली पानसरे यांच्या जन्मभूमी कोल्हार (जि. अहमदनगर) येथून निघून तो कोल्हापुरात येणार आहे. सकाळी दोनही जथ्थे कावळा नाका येथे जमून त्यानंतर सागरमाळ येथील पानसरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ पोहोचणार आहेत. यानंतर ते निर्धार शपथ घेऊन मिरवणुकीद्वारे दसरा चौक येथे पोहोचणार आहेत. या ठिकाणी दुपारी १२ वाजता सभेला सुरुवात होणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाकपचे दिलीप पवार, एस. बी. पाटील, दिनकर सूर्यवंशी, चंद्रकांत यादव, अंधश्रद्धा निर्मूलनच्या सुनील स्वामी, सुजाता म्हेत्रे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा