शहराच्या राजकीय वर्तुळात बहुचíचत ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बुधवारी पार पडताना चांगलीच राजकीय घुसळण झाली. या पदासाठी आलेल्या अर्जावर सत्ताधारी आणि विरोधी गटाने आक्षेप घेतले. त्यामुळे घेण्यात आलेल्या मतदानात बहुमताने माजी महापौर, ताराराणी आघाडीचे सुनील कदम यांचा अर्ज फेटाळण्यात आला. तर इतर चार सदस्यांच्या निवडीवेळी बहुमतांचा आकडा सत्ताधारी आघाडीच्या बाजूने राहिल्याने त्यांचे तीन, तर तटस्थ भूमिकेने विरोधी गटाच्या एका सदस्याची निवड पार पडली. माजी महापौर कदम यांचा अशाप्रकारे पत्ता कट होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. मात्र काँग्रेसने बिनआवाजाचा बॉम्ब फोडून विरोधी गटाला चांगलाच झटका दिला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी १६ जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जाना मंजुरी देऊन सदस्य निवडीसाठीचा विषय आजच्या महापालिकेच्या सभेत होता. एकूण पाच जागांवर होणाऱ्या या निवडीसाठी काँग्रेसकडून मोहन सालपे, तौफिक मुलाणी, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, भाजपकडून किरण नकाते आणि ताराराणी आघाडीकडून सुनील कदम यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.
त्यापकी कदम यांच्या अर्जावर काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी आक्षेप घेतला. कदम यांनी त्यांचावर दोन वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा होईल असे गुन्हे नोंद असताना त्याची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवली असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय, कदम हे महापालिकेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. तसेच लाचप्रकरणी पकडलेल्या तृप्ती माळवी यांनाही त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे महापालिकेची बदनामी करणाऱ्या माजी महापौर कदम यांना सभागृहात घेण्यास काँग्रेसने राष्ट्रवादीला तीव्र विरोध दर्शवला.
वकील सूरमंजिरी लाटकर आणि शारंगधर देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित करत महापालिका अधिनियमानुसार त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली. तर विरोधी गटाकडून रूपाराणी निकम यांनी कदम यांना अद्याप न्यायालयाने दोषी ठरवले नसून, प्रशासनाला त्यांचा अर्ज बाद ठरवण्याचा अधिकार नसल्याच स्पष्ट केले. त्यामुळे सभागृहात तणाव वाढला. दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी प्रशासनाला आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूच्या आरोप-प्रत्यारोपामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता.
यावर आयुक्त पी. शिवशंकर यांनी विधी तज्ज्ञांचा अभिप्राय मागवला. त्यानुसार महापौर अश्विनी रामाने यांनी मतदान घेऊन हे अर्ज वैध की अवैध ठरवायचे याचा निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार घेण्यात आलेल्या मतदानात सुनील कदम यांचा अर्ज बहुमताने फेटाळण्यात आला. घेतलेल्या मतदानात ४३ विरुद्ध ३४ मतांनी हा अर्ज फेटाळण्यात आला. विरोधी आघाडीच्या मागणीनुसार इतर जागांवरही मतदान घेण्यात आले. यामध्ये काँग्रेसच्या मोहन सालपे यांचा अर्ज वैध ठरवण्याच्या बाजूने ४३ विरुद्ध ३२, तौफिक मुलाणी यांना ४७ विरुद्ध ३२ अशी मते पडली. यामध्ये सालपे यांना शिवसेनेने मतदान केले नाही. राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना ४३ विरुद्ध ३२ मते पडली. किरण नकाते यांच्याबाबत मात्र काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतली, त्यामुळे किरण नकाते यांचा अर्ज आपोआप वैध ठरला.
सुनील कदम यांच्या अर्जाबाबत सरकारकडून पुढील मार्गदर्शन मागवण्यात येईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. गटनेता शारंगधर देशमुख यांनी व्यक्तीला विरोध नाही, तर प्रवृत्तीला विरोध केल्याचे या निवडप्रक्रियेनंतर सभागृहात स्पष्ट केले.
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून कोल्हापूर महापालिकेत गोंधळ
सत्ताधारी आणि विरोधी गटाचे आक्षेप
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 22-01-2016 at 03:25 IST
TOPICSगोंधळ
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in kolhapur mnc over approved corporator election