महापालिकेची सभा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठीची, पण ती गाजली जनता बझार या सहकारी संस्थेच्या घरफाळा विषयावरून. या संस्थेचा घरफाळा ६५ लाख रुपये असताना साडेबारा लाख रुपये या अल्प रकेमवर तडजोड का केली, असा आरोप संभाजी जाधव यांनी केला. त्यावरून शारंगधर देशमुख व जयश्री चव्हाण यांनी जनता बझारच्या विषयालाच लक्ष्य करण्यामागे जाधव यांना वैयक्तिक रस का आहे, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केल्याने सभेत शाब्दिक वाद रंगत गेला. अखेर जयंत पाटील या ज्येष्ठ सदस्यांनी अर्थसंकल्पीय सभेचे महत्त्व सांगत हा विषय या सभेत उपस्थित करू नका, असा सल्ला दिल्यावर वादावर पडदा पडला.
या सभेमध्ये महसुली व भांडवली जमा रक्कम ४५७ कोटी रुपये अपेक्षित असून खर्च ४५२ कोटी रुपये अपेक्षित असून शिल्लक रक्कम ५ कोटी रुपये इतकी आहे तर विशेषप्रकल्प अंतर्गत स्वतंत्र अंदाज पत्रकामध्ये जमेसाठी ६७४ कोटी तर खर्चासाठी ५७६ कोटी रुपये धरण्यात आले आहेत. उपसूचनांसह अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली असून यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या वैशिष्टय़पूर्ण योजनेचा समावेश नाही. प्रशासनाने घरफाळय़ामध्ये वाढ केली असून शासनाच्या मार्गदर्शनानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.
स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. आतापर्यंतच्या प्रत्येक सभेवेळी सभापती अंदाजपत्रकाचे वाचन करीत असत. आज मात्र अंदाजपत्रकाचे चलत्चित्राद्वारे सादरीकरण करण्यात आले. करवाढ नसल्यामुळे सदस्यांचा नेहमीचा आक्रमक नूर आज पाहायला मिळाला नाही. तथापि अंदाजपत्रकावर मतप्रदर्शन करताना प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर तोंडसुख घेतले. करसंकलनामध्ये प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. अंदाजपत्रकामध्ये जुन्या कामांना गती देण्याचा संकल्प केला असला तरी त्यासाठी निधीचे नियोजन करण्यात प्रशासनाने मागे राहू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.
यावर्षीच्या अंदाजपत्रकात सेफसिटी प्रकल्प दुसरा टप्पा, बहुमजली वाहन तळ, वायफाय सिस्टिम सुरू करणे, महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, घरफाळा मिळकतीचे जीआयएस सर्वेक्षण, घनकचरा उपाययोजना, आरोग्याच्या तक्रार निवारणासाठी मोबाईल अ‍ॅप सुरू करणे, हेरीटेज वास्तूंच्या जतनासाठी योजना, गोिवदराव पानसरे स्मारक, मेडिकल हेल्थ सिटी उभारणे, रंकाळा संवर्धन, भटक्या कुत्र्यांचे नियोजन या प्रमुख कामांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा