करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात आज महिलांच्या गाभा-यातील प्रवेशावरून गोंधळ उडाला. येथील अवनी संस्थेच्या महिलांना काल झालेल्या बैठकीत गर्भगृहाच्या उंबरठय़ापासून दर्शन देण्याचे ठरले असताना आज या महिला आंदोलकांनी गाभा-यातच प्रवेशाची मागणी करत तसा प्रयत्न केला. या वेळी अन्य महिला भाविक, कर्मचा-यांनी त्यांना जोरदार विरोध करत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. हा प्रकार महिलांना गाभा-यात जाण्यापासून रोखण्यासाठी जाणीवपूर्वक श्रीपूजकांनी केल्याचा आरोप अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी केला.
न्यायालयाने अलीकडेच पुरुषांबरोबर महिलांनाही मंदिरांमध्ये प्रवेश देण्यात यावा असा आदेश दिला आहे. या आदेशाला अनुसरून सोमवारी भोसले यांच्यासह काही महिलांनी महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात जाऊन दर्शन घेण्याचे ठरविले होते. यासाठी रविवारी वरिष्ठ पोलीस अधिकारी, देवस्थान समिती, श्रीपूजक व भोसले यांच्या उपस्थितीत एक बठक झाली होती. त्यामध्ये मंदिरातील चांदीच्या उंबरठय़ापासून दर्शन घ्यावे, असा निर्णय झाला होता.
मात्र भोसले यांच्यासह ५० हून अधिक महिलांनी आज मंदिरात येऊन थेट गाभा-यात जाऊनच दर्शन घेण्याची भूमिका घेतली. त्यांनी गाभा-यात प्रवेश करतेवेळी मंदिरामध्ये अभिषेक सुरू होता. या धार्मिक प्रक्रियेत अडथळा आणू नये, असे अन्य महिला भाविकांचे म्हणणे होते. त्यातून आंदोलक महिला व भाविक महिला यांच्यात शाब्दिक वादावादी तसेच झटापटही झाली. त्यांना देवस्थान समितीच्या महिला कर्मचारी आणि स्थानिक महिलांनी तीव्र विरोध केला.
या वेळी श्रीपूजक महिला आणि स्थानिक महिलांनी या आंदोलकांना मंदिरातून बाहेर काढले. याचा अवनी संस्थेच्या आंदोलक महिलांनी निषेध केला. तसेच महिला भक्तांना पुढे करून श्रीपूजकांनी मारहाण केल्याचा आरोप केला. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन आंदोलक व महिला भक्तातील वाद आटोक्यात आणला.
श्रीपूजकांच्यावतीने त्यांचे म्हणणे मांडण्यात आले आहे. घटनेचा विपर्यास केला जात असल्याचे सांगत अजित ठाणेकर म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाची प्रत तरी येऊ दे, मग काय करायचे ते पाहता येईल. आज श्रीपूजकांनी कोणालाही अडविलेले नाही. अनुराधा भोसले सवंग प्रसिध्दीसाठी ‘फार्स’ निर्माण करून स्वतला वलयांकित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा