एकनाथ खडसे यांचा आरोप
करवीरनगरीतील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड हडप करुन तेथे पंचतारांकित हॉटेल, कॉलेज, अपार्टमेंट उभे करण्याचे काम इथल्या काँग्रेस नेत्यांनी केले आहे. तर भ्रष्टाचार करुन सहकारी बँका बुडवायच्या हे राष्ट्रवादीच्या नेत्याचे धोरण आहे, अशा परखड शब्दांत राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे झालेल्या सभेमध्ये सतेज पाटील व हसन मुश्रीफ या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांवर शरसंधाण केले. तर माजी महापौर, ताराराणी आघाडीचे नेते सुनिल कदम यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत मुश्रीफ यांच्यावर दहा कोटीच्या कर्जाची जबाबदारी निश्चित झाली असताना त्यांनी हा पसा कोठे नेऊन ठेवला, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी शहरातील आठ हजार चौरस फुटाचा भूखंड लाटल्याचा आरोप केला.

भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खडसे यांच्या तीन सभा पार पडल्या. यावेळी ते म्हणाले, पंधरा वष्रे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत काम करताना राज्याचे तसेच या शहराचेही प्रश्न सोडविले नाहीत. केवळ आश्वासने देताना दररोज भ्रष्टाचाराची प्रकरणे केली. आता भाजपवर टीका करताना अच्छे दिन कोठे आहेत, असा प्रश्न करतात. गेल्या एक वर्षांतील पेट्रोल, डिझेल गॅसचे उतरलेले दर, केंद्र व राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अनेक योजना गेले अनेक वष्रे नागरिकांना अडचणीत आणणारे नियम, बदलून घेतलेले निर्णय, यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वारसांच्या प्रॉपर्टी नोंदणीसाठी स्टॅम्प डय़ुटी रद्द करण्याचा निर्णय हा नागरिकांना अडचणीतून बाहेर काढणारा आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर बांधून देण्याचा कार्यक्रम आम्ही राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वर्षांनुवष्रे एका जागेवर राहणाऱ्या शहरातील कुटुंबीयांना साडेतेराशे हेक्टर जमीन त्यांच्या नावे करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की भाजपच्या कमळ चिन्हाचा विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीला धसका बसला आहे. भाजपची विजयी घोडदौड चालू असल्यामुळे महालक्ष्मीला वाहनाऱ्या कमळ फुलाबाबतही आक्षेप घेतला जात आहे.
आमचे ध्येय कोल्हापूर शहर श्रीमंत करण्याचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, भाजपाचे शहर अध्यक्ष महेश जाधव, सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

Story img Loader