कोल्हापूर : एकदा फसविलेल्यांना पुन्हा मदत करणार नाही, अशा शब्दात कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आघाडीचे उमेदवार, खासदार धनंजय महाडिक यांना उघडपणे विरोध केला. याच वेळी त्यांनी ‘एक बार मैने डिसिजन ले लीया तो मैं किसीं की नही सुनता’ असा फिल्मी संवाद म्हणून दाखवत शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभेचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांना उघडपणे पाठबळ दिले.
आमदार सतेज पाटील आणि प्रतिमा सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गृहिणी महोत्सवात दुसऱ्या दिवशी सोनी मराठी प्रस्तुत ‘जल्लोष लोकसंगीताचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार पाटील यांनी ‘जिल्ह्याच्या विकासाची सूत्रे हातात येणारे आमचे मित्र संजय मंडलिक’ अशा शब्दात भाषणाला सुरुवात करत राजकीय दिशा स्पष्ट केली. गेल्या निवडणुकीत मला फसविलेल्यांना पुन्हा साथ देणार नाही. त्यामुळे संजय मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीत काळजी करू नये, असे नमूद करून आमदार पाटील यांनी मंडलिक यांना विश्वास दिला.
प्रतिमा सतेज पाटील यांनी सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून सुमारे दोन लाख महिला जोडल्या गेल्या असल्याचे सांगितले. यानंतर गायक आनंद शिंदे यांनी सर्व कलाकारांना प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
या वेळी संजय मंडलिक, डॉ. संजय डी. पाटील, युवा नेते ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, शांतादेवी डी पाटील, वैजयंता पाटील, राजश्री काकडे, करण काकडे, चैत्राली काकडे, उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, वैशाली क्षीरसागर उपस्थित होते.