कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता येणार असल्याचे मंगळवारी निश्चित झाले. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या वाटाघाटींनुसार पुढील एक वर्षासाठी महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात येणार आहे. काँग्रेस नेते पतंगराव कदम, सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या झालेल्या चर्चेनंतर आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक वर्षानंतर महापौर आणि उपमहापौर पदांसंदर्भात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ निर्णय घेतील, असेही निश्चित करण्यात आले आहे.
एकूण ८१ जागा असलेल्या महापालिकेमध्ये काँग्रेस २७ जागा मिळवत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्या आहेत. महापालिकेत महापौरपद निवडून आणण्यासाठी आवश्यक असलेला ४१ चा आकडा गाठणे या दोन्ही पक्षांच्या आघाडीमुळे शक्य होणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याचे सूतोवाच केले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राष्ट्रवादीसोबत आघाडी करून कोल्हापूरमध्ये सत्ता मिळवली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरमधील नेते हसन मुश्रीफ यांनीही काँग्रेस आमचा नैसर्गिक मित्र असून, त्यांच्यासोबत आघाडीला प्राधान्य दिले जाईल, असे कालच स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader