कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं आहे. या निवडणूकीमध्ये भाजप आणि ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे यांनी बाजी मारली. भाजपाच्या आशिष ढवळे यांना ९ मते मिळाली तर काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांची दोन मते फुटल्याने चांगलाच धक्का बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी आघाडीने ठरलेल्या फॉर्म्यल्यानुसार राष्ट्रवादीला उमेदवारी दिली होती. सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ पाहता राष्ट्रवादीच्या नगरसेविका मेघा पाटील या महापालिकेतील स्थायी समितीच्या पहिल्या सभापती होतील असे वाटत होते. पण राष्ट्रवादीच्या या अपेक्षेवर पाणी फिरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पराभवाला पक्षांतर्गत नाराजी, गटबाजी कारणीभूत ठरली असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी आपली मते भाजपच्या पारड्यात टाकली. त्यामुळे ७ मतं मिळालेल्या पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कोल्हापूर महानगरपालिकेतही ही घडामोड सत्ताधारी पक्षासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत एकच जल्लोष केला.

अवश्य वाचा – शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत बेदिली

याचसोबत परिवहन समिती निवडणुकीच्या वेळी वेगळं चित्र पहायला मिळालं. परिवहन समिती निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलेले पहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेचे राहुल चव्हाण यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या शेखर कुसाळे यांचा पराभव केला. विषय समिती निवडीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेने मदत केली होती, त्याची परतफेड करत सत्ताधारी पक्षाने आज शिवसेनेला परिवहन समितीचे सभापतीपद देऊन केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp receives setback in kolhapur municipal corporation as bjp bags standing committee chairmanship post