कोल्हापूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने बुधवारी येथे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केल्यानंतर काँग्रेसने निषेध व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, महिला आघाडी अध्यक्षा सरला पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते गॅस टाकी हातात घेऊन आले. कार्यकर्त्यांनी पेट्रोल गॅस दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या दरवाढीमुळे महिलांचे घरखर्चाचे गणित बिघडले आहे. निवडणुकीत महागाई कमी करण्याच्या आश्वासनांना केंद्र सरकारने हरताळ फासला आहे. सामान्यांच्या प्रश्नासाठी हक्कासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे, असा निर्धार दुर्वास कदम, सुरेश जरग, दीपा पाटील, भारती पवार, चंदा बेलेकर आदी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.