दयानंद लिपारे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित झाल्यानंतर लगेचच काँग्रेस – भाजपमध्ये खडाखडीला सुरुवात झाली आहे.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असताना मविआची उमेदवारी कोणाला यावरून विवाद निर्माण झाला होता. मतदारसंघात आपला उमेदवार असल्याने काँग्रेसने उमेदवारीचा दावा केला होता. या मतदारसंघात सातत्याने शिवसेनेचा आमदार निवडून येत असल्याने उमेदवारी मिळावी, असा सेनेचा दावा होता. अखेर आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईत होऊन जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसने जयश्री जाधव तर भाजपने सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच प्रचाराचा धुरळा उठला आहे. उमेदवारांनी पक्ष बदललेले असल्याने उमेदवारांवर व्यक्तिगत टीका किती करायची याला काही मर्यादा आल्या आहेत. चंद्रकांत जाधव व त्यांच्या पत्नी जयश्री या मूळच्या भाजपच्या. गेल्या वेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवून त्यांनी विजय मिळवला होता. त्यातूनच चंद्रकांत पाटील यांनी जयश्री जाधव यांना भाजपची उमेदवारी घेण्याचा आग्रह धरला होता. पण जाधव यांनी हातमिळवणी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. आपल्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मन मोठे करायला हवे होते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत सत्यजीत कदम यांनी काँग्रेसकडून लढवून लक्षणीय मते मिळवली होती. अलीकडे त्यांनी भाजपमध्ये केवळ प्रवेश केला नाही तर पक्षाची उमेदवारीही मिळवली आहे. जाधव – कदम या दोन्ही तालेवार घराण्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता इकडचे उमेदवार तिकडे आणि तिकडचे इकडे अशी अदलाबदल झाली आहे. दोघा माजी नगरसेवकातून आमदार होण्याची पहिली संधी कोणाला? शहराची पहिली महिला आमदार होणार का? याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे.

सत्ताधाऱ्यांची मोर्चेबांधी

पोटनिवडणुकीची लढत प्रामुख्याने मविआतील काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्ष आणि भाजप व मित्र पक्ष यांच्यात होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. ही निवडणूक जिंकून काँग्रेसमधील आपले स्थान अधिक भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे पाठबळ जाधव यांच्यामागे राहील, असा निर्वाळा रविवारच्या मेळाव्यात दिला आहे. शंका होत्या त्या शिवसेनेबद्दल. माजी आमदार क्षीरसागर यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. मविआच्या धोरणानुसार मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. मविआच्या मेळाव्याला क्षीरसागर उपस्थित नव्हते. त्यानंतरच्या बैठकीत त्यांनी सेनेचा आदेश शिरसावंद्य मानून जाधव यांचा प्रचार करणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. मेळाव्यात शिवसेनेकडून दगाफटका होण्याची शक्यता राष्ट्रवादीने व्यक्त केल्यावर संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनी शिवसेना पाठीमागून वार करत नाही, असे म्हणत शंका दूर करतानाच सेना जाधव यांच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपचे हिंदूत्व चार राज्यांतील निवडणुकीचा परिणाम कोल्हापुरातही दिसावा या दिशेने भाजपची नियोजनाची पावले पडत आहेत. प्रखर हिंदूत्वाचा मुद्दा भाजपकडून लावून धरला जात आहे. यासाठी काश्मीर फाइल्स चित्रपट मोठय़ा प्रमाणात मतदारांपर्यंत पोचवला जात आहे. समाजमाध्यमातून भाजपची भूमिका मतदारांच्या गळी उतरवली जात आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढविली असल्याने त्यांना मानणारा एक वर्ग शहरात आहे. तर महापालिकेची निवडणूक आगामी निवडणूक लढवण्यासाठी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी तयारी चालवली असून त्यांच्या संपर्कात काही लोक आहेत. कोरे – आवाडे हे दोन्ही अपक्ष आमदार, जनसुराज्यचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या संपर्काचा काही प्रमाणात कदम यांना फायदा होऊ शकतो. निवडणुकीचे प्राथमिक क्षेत्र पाहता महा विकास आघाडी झ्र् भाजप यांच्यात आखाडा रंगणार हे दिसत आहे.