लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील पाण्याच्या भूमिगत टाकीवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा कक्षाची इमारत उभी राहिली आहे. विख्यात वास्तुविशारद शिरीष बेरी यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून ही वास्तु साकारली आहे. विशेष म्हणजे जीबीएस सिंड्रोम या आजारातून बरे झालेल्या युवराज पाटील या मुलाच्या हस्ते याचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले.
सीपीआर रुग्णालयात असलेल्या दूधगंगा वेदगंगा या इमारती जवळ भूमिगत पाण्याची टाकी आहे. त्यावर बसूनच जमेल तसे रुग्णांचे नातेवाईकजेवण, विश्रांती घेत असतात. साठी या रुग्णालयात कसली वेगळी सोय नाही. ही अडचणीची परिस्थिती एके दिवशी शिरीष बेरी यांनी पाहिली.
आणखी वाचा-यंत्रमाग उद्योग अभ्यास समितीचा बहुप्रतीक्षेत अहवाल सादर; कुतूहल वाढले
अडचणींचा सामना
त्यांनी या भूमिगत टाकीवर निवारा इमारत उभारण्याची संकल्पना रुग्णालयाकडे मांडली. तेव्हा त्यांनी कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगितले. मात्र या विभागाने परवानगी नाकारली.
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न
एके दिवशी शिरीष बेरी यांनी हा विषय तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोर मांडला. तेव्हा त्यांनी सावर्जनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून बांधकाम करण्यास परवानगी देण्यास सांगितले.
आणखी वाचा-कोल्हापूर: गुजरी पेठेत भरदिवसा दरोडा, तिघांना अटक; १५ लाखाचे दागिने जप्त
स्वप्न साकारले
त्यानुसार शिरीष बेरी यांनी त्यांच्या सामाजिक सेवा कार्याच्या निधीतून १५ लाख रुपये खर्च करून ही वास्तू बांधली आहे. याचा लोकार्पण सोहळा आज शिरीष बेरी, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, डॉ. शिरीष मुरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे, वास्तुविशारद आशर फिलिप, दिलीप कडू, रेणुदास कोटकर, मक्तेदार रघुनाथ शेटे, विश्वजीत चव्हाण, महेंद्र चव्हाण, रावत आदी उपस्थित होते.