पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय राखून आवश्यक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशी सूचना पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी येथे केली.
पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम बोलत होते.
कोल्हापूर महानगरपालिकेने पंपिंग स्टेशनचे काम प्राधान्याने करण्याची सूचना करून चोक्कलिंगम म्हणाले, महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया करून शुध्द झालेले पाणी शेतक-यांना देण्याबाबत प्रस्ताव केला असून हा प्रस्ताव मार्गी लावण्याची सूचना त्यांनी केली. तसेच इचलकरंजी नगरपरिषद हद्दीमधील ११० किलो मीटर पाइपलाइनचे काम हाती घेतले असून आतापर्यंत २७ किलो मीटर पाइपलाइनचे काम नगरपालिकेने पूर्ण केले असून उर्वरित पाइपलाइनचे काम प्राधान्यक्रमाने करण्याची सूचना त्यांनी  केली. तसेच सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामार्फत प्रक्रिया केलेले पाणी शेतक-यांना देण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना केली.
या वेळी जैववैद्यकीय कचऱ्याबाबत कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील दवाखान्यामधील मेडिकल वेस्ट विल्हेवाट करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थेमध्ये सर्व डॉक्टर्सनी सहभागी होऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना यावेळी केली तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने करण्याचीही सूचना त्यांनी केली. या बठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमीत सनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पी. अन्ब्लगन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहायक सचिव तपास नंदी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे  प्रादेशिक अधिकारी न. ह. शिवांगी, महाराष्ट्र औद्योगिक विकास विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. वराळे, पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, नीरीचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी., इचलकरंजी नगरपरिषद, महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader