इचलकरंजी शहरातील करोनाची लागण झालेला बालक मंगळवारी बरा झाला. करोनामुक्त झालेल्या या बालकाला आज फुलांचा वर्षाव करीत डिस्चार्ज देण्यात आला.

इचलकरंजीतील कोले मळा येथील एका वृद्धाला करोनाची लागण झाली होती. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या चार वर्षाच्या नातवाला करोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याची चाचणी घेण्यात आली असता नकारात्मक आली.

करोनामुक्त झालेल्या या बालकाला आज टाळ्या वाजवत, फुलांचा वर्षाव करीत इचलकरंजीतील आयजीएम इस्पितळातून आईसह डिस्चार्ज देण्यात आला. सध्या हा मुलगा आणि त्याच्या आईला हातकणंगले येथे संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

तिघांचे फॉलोअप रिपोर्ट निगेटिव्ह

दरम्यान, उचत, कसबा बावडा येथील वृद्धा आणि कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या कर्नाटकातील पुरूषाचा पहिला फॉलोअप स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याचे दुसऱ्यांदा स्वॅब घेतले असून त्याचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली. सीपीआर प्रशासनाकडे सोमवारी रात्री उशीरा काही स्वॅब रिपोर्ट आले. या १४८ पैकी १४३ स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच ५ स्वॅब रिपोर्ट तांत्रिक कारणास्तव प्रलंबित आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी दिली.

Story img Loader