नगरसेवक व त्याच्या भावाने महापालिकेचे आरोग्य निरीक्षक गेंजगे यांना शिवीगाळ, मारहाण केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी महासंघाने शुक्रवारी काम बंद केले खरे, पण यावर तोडगा काढण्यासाठी आयोजित बठकीस मासळी बाजाराचे स्वरूप आले. आव्हान प्रतिआव्हान देतच कर्मचारी संघ व नगरसेवक शिवराळ भाषेत बोलू लागल्याने आयुक्त, महापौर यांनाही हा सावळा गोंधळ पाहात बसण्यावाचून पर्याय उरला नव्हता. नगरसेवक म्हणून निवडून आला म्हणजे आभाळाला हात टेकले नाहीत. कर्मचा-यांशी उद्धट वर्तन करून त्यांना हीन वागणूक दिली जाते. यापुढे असे प्रकार घडल्यास नगरसेवकांना कर्मचारी घरात घुसून झाडूने मारतील, असा खरमरीत इशारा महापालिका कर्मचारी संघाच्या वतीने नगरसेवकांना देण्यात आला. तर, तुम्ही ५०० जण आलात तरी आम्ही ५० जण तुम्हाला पुरून उरू. आम्ही बांगडय़ा भरल्या नाहीत, असे  प्रतिआव्हान नगरसेवकांनी कर्मचा-यांना दिले. सामोपचाराऐवजी जिरवाजिरवीच्या कटुतेचे दर्शन या बठकीत घडले. दुपारी काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले.
मनसेचे नगरसेवक राजू दिंडोल्रे व त्यांचा भाऊ विशाल यांनी महापालिकेचे आरोग्य निरीक्षक संजय गेंजगे यांना घरात बोलावून शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत कर्मचारी महासंघाने तातडीची बठक घेऊन शुक्रवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले होते. कर्मचा-यांनी मुख्य दरवाजासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आजच महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा असल्याने सर्व पदाधिकारी नगरसेवक सभेसाठी महापालिकेत आले होते. पण तत्पूर्वीच महापालिकेतील तीन हजारांहून अधिक कर्मचारी काम बंद आंदोलन करीत महापालिकेसमोर जमले होते. यामुळे सभा सुरू करणे अवघड बनले होते. याबाबत स्थायी सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, संभाजी जाधव, सुनील पाटील, प्रा. जयंत पाटील यांनी तडजोडीचे प्रयत्न सुरू केले. सभागृहात नगरसेवक जमले असतानाच या सर्व प्रमुखांनी कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात जाऊन अध्यक्ष रमेश देसाई, उपाध्यक्ष दिनकर आवळे, विजय वणकुद्रे यांच्याशी चर्चा सुरूकेली.
या वेळी नगरसेवकांनी अध्यक्ष रमेश देसाई यांच्यासह कर्मचा-यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र कर्मचारी संघाने ही मागणी धुडकावून लावली. देसाई यांनी  नगरसेवक नवीन आहेत. नव्या नवरीचे नऊ दिवस, याप्रमाणे ते वागत आहेत, असा टोला लगावला. कर्मचा-यांना वेठीस धरणे, त्यांना अरेरावी, शिवीगाळ, मारहाण करणे हे चुकीचे आहे. यामुळे आता कर्मचारी संघटना कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक व त्यांच्या नातेवाइकांचा अरेरावीपणा दिवसेंदिवस वाढत आहे. कर्मचार काम करताना नेहमी तणावग्रस्त असल्याने तो कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. कर्मचारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
त्यावर नगरसेवकांनी गेजगे मारहाण प्रकाराबद्दल संघटनेची दिलगिरी व्यक्त केली, पण ज्यांनी मारहाण केली त्यांनीच माफी मागावी अशी भूमिका संघटनांनी घेतली.
आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीमध्ये कर्मचारी संघटना व नगरसेवकांची बठक पार पडली. कामचुकार कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे कर्तव्य आयुक्तांचे असताना ते कर्तव्य करत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी या वेळी केला. एका कर्मचा-यांवर कारवाई केल्यास शंभर कर्मचारी वठणीवर येतील असे नगरसेवकांनी सांगितले. कर्मचारी संघटना आमच्या विरोधात एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. मात्र सभागृहात ८१ नगरसेवक, त्यांचे समर्थक आहेत. नगरसेवकांचीही संघटना करून कर्मचा-यांना ताकद दाखवून देऊ, असे नगरसेवकांनी सांगीतले. तर महापालिका कर्मचारी संघाच्या वतीने नगरसेवकांना प्रत्युत्तर देताना कर्मचा-यांशी उद्धट वर्तन करून त्यांना हीन वागणूक दिली जाते. यापुढे असे प्रकार घडल्यास नगरसेवकांना कर्मचारी घरात घुसून झाडूने मारतील, असा खरमरीत इशारा देण्यात आला.
हा निघाला तोडगा…
एखादा कर्मचारी कामचुकारपणा करताना आढळल्यास त्यावर प्रशासनाने कारवाई केल्यास संघटनेचा पाठिंबा राहील, असे मत संघटनेच्या वतीने  बैठकीत मांडण्यात आले. तर नगरसेवकांची बठक घेऊन त्यांना कर्मचा-यांशी सामंजस्याने वागण्याच्या सूचना देऊ, असा तोडगा निघाला. त्यानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला तरी त्यानंतरही महापालिकेचे कामकाज विस्कळीत झाले होते.

Story img Loader