कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील देवस्थान समितीच्या दानपेट्यांमध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांची मोजदाद मंदिर कार्यालयात मंगळवारपासून सुरू झाली आहे. २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत मंदीरात जमा असलेले दागिने यावेळी मोजले जात आहेत.
गेल्या चार वर्षातील दानाची मोजदाद देवीच्या मंदिरातील देवस्थान कार्यालयात सुरू आहे. मंदिरात अर्पण होणारे दागदागिने सोन्या- चांदीचे अलंकार नोंद करून ते दरमहा पिशवीमध्ये ठेवले जाते. ठराविक कालानंतर देवस्थान समितीमार्फत या दागिन्यांची मोजणी केली जाते. तज्ञ मुल्यांकनकर्तामार्फत या दागिन्यांचे मुल्यांकनही चालू बाजारभावाप्रमाणे नोंदवले जाते.
हेही वाचा…महायुतीच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक; कोणा एकावर ठपका नको – हसन मुश्रीफ
आज पहिल्याच दिवशी दागिने मोजणी करताना देवीला सोन्या-चांदीची नाणी, मूर्ती, सौभाग्यअलंकार, पैंजण, जोडवी अर्पण झाल्याचे निर्दशनास आले. पुढील काही दिवस ही मोजदाद सुरू राहणार असून अंतिम मोजणी झाल्यावर एकुण किती दान जमा झाले हे प्रसिद्ध केले जाणार आहे. ही मोजणी नाशिक येथील प्रसिद्ध मुल्यांकनकर्ता नितिन वडनेरे, शेखर वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मंदीर व्यवस्थापक महादेव दिंडे, खजिनदार महेश खांडेकर, निवास चव्हाण, शितल इंगवले,विशाल आगरकर, महेश महामुनी, एकनाथ पारखी, देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.