कोल्हापूर : वारणा कारखाना परिसरातील आंदोलन तसेच लोकसभा निवडणुकीवेळी केलेले वादग्रस्त विधान अशा दोन खटल्यांत वडगांव दिवाणी व फौजदारी न्यायालयाने माजी खासदार राजू शेट्टी व सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. वारणा कारखाना परिसरात २०१७ साली शेतकऱ्यांनी ऊस दर आंदोलन केले होते.
त्यात सहभागी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपत पोवार, बाळासो मोरे, प्रकाश पाटील, सतीश धुमाळ, विकास चाळके, प्रवीण पाटील, छन्नुसिंह मोहिते, सुरेश पाटील, राजू कापसे, विनायक घाटगे, अविनाश चाळके, सचिन मोरे, मारुती बोने पाटील, किरण पाटील यांच्यासह नेते राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याबरोबरच, २०१९ सालच्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी जातीयवादी वादग्रस्त विधान करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने दोन्ही खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. शेतकरी यांच्या वतीने दीपक पाटील, सुधीर पाटील, अरुणा पाटील या वकिलांनी विनामूल्य काम पाहिले. याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना धन्यवाद दिले.