कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत कॉ.गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील दुसऱ्या नंबरचा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी रद्द केला. दहशतवाद विरोधी पथकाने डॉ. तावडे याला तातडीने ताब्यात घ्यावे असा आदेश न्यायाधीश तांबे यांनी दिला. मंगळवारी (दि. १६) झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. त्यानुसार एटीएसने डॉ.तावडे यांना ताब्यात घेऊन सीपीआर येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोल्हापूर: नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न

या खटल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी, कॉ.गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी डॉ. वीरेंद्र तावडे हे दोन नंबरचे संशयित आरोपी आहेत. त्यांचा या खुनामध्ये सहभाग असल्याचे पुरावे विशेष तपास पथकाला (एसआयटी) मिळाले होते.

दरम्यान संशयित तावडे हा डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनप्रकरणी सीबीआयच्या अटकेत होता. एसआयटीने सप्टेंबर २०१६ मध्ये सीबीआयकडून तावडे याचा ताबा घेतला. पानसरे यांच्या खुनाचा कट रचण्यापासून हल्लेखोरांना प्रशिक्षण देणे, त्यांना शस्त्रे आणि वाहनांची उपलब्धता करून देणे, राहण्याची व्यवस्था करण्याचे काम तावडे याने केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. दरम्यान, तावडे याच्या वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

हेही वाचा >>> विशाळगडची घटना जिल्हा प्रशासन, पोलिसांचे अपयश – शाहू छत्रपती यांचा आरोप

त्यानुसार त्याला जानेवारी २०१८ मध्ये जामीन मंजूर झाला होता. यावर आक्षेप घेत विशेष सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरण जिल्हा न्यायालयात चालवून त्यावर निर्णय व्हावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष सरकारी वकिलांनी डॉ. तावडे याचा जामीन रद्द करण्याची विनंती जिल्हा न्यायालयाकडे केली होती. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांचा युक्तीवाद आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकून अखेर न्यायाधीश तांबे यांनी संशयित तावडे याचा जामीन रद्द केला. तसेच त्याला तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश एटीएसला दिला. यावेळी बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर, संशयित आरोपी तावडे उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court in kolhapur cancels bail of accused dr tawde in govind pansare murder case zws