लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर लगेचच राज्यात दुधाला सर्वाधिक दर देण्याचा कोल्हापूर जिल्ह्याचा तोरा उतरणीला लागला आहे. जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघानी गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले. यामुळे दूध उत्पादकांना दहा टक्के कमी म्हणजे तीन रुपये कमी मिळणार आहेत.

खासगी व सहकारी दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील डेअरी प्रतिनिधींची बैठक येथे झाली. त्यात सध्याच्या दूध भुकटी, लोणी, दुधाचे बाजारातील खरेदी विक्रीचे दरवाढ होणार नसल्याच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाचा ऑक्टोबरपासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता किमान प्रतिलिटर दर २८ रुपये आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ २७ ते २८ रुपये दराने गाय दूध खरेदी करत आहेत.

आणखी वाचा-कोल्हापुरात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; निकालाचे कुतूहल

फक्त कोल्हापूर जिल्ह्यात ३३ रुपये म्हणजे प्रतिलिटर ६ रुपये दर जास्त आहे. यापुढे गाय दुधाची उपलब्धता चांगली असेल. अशा परिस्थितीत दूध खरेदी दर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यावर एकमत झाले. २१ नोव्हेंबरपासून गाय दूध खरेदी दर ३३ ऐवजी ३० रुपये दर देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. बैठकीला गोकुळ, राजारामबापू दूध, वारणा, भारत डेअरी व इतर दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Story img Loader