कोल्हापूर : कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत ७६ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला असल्याचे गुरुवारी सूत्रांनी सांगितले. वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध कोल्हापूर परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरू असते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात ४८१० तर सांगली जिल्ह्यात २४३२ वीज ग्राहकांची शनिवारी तपासणी केली.

कोल्हापूर जिल्ह्यात ३७ वीज ग्राहकांकडून ३०,२१८ युनिटची वीज चोरी करण्यात आली असून, ६ ग्राहकांकडून ६० हजारांची वसुली करण्यात आली. सांगली जिल्ह्यात ३९ वीज ग्राहकांकडून २४,७०५ युनिटची वीज चोरी करण्यात आली असून, ४ ग्राहकांकडून ५१ हजारांची वसुली करण्यात आली आहे. वरील सर्वच वीज चोरी प्रकरणांत संबंधित वीज ग्राहकांना दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे वीज बिल देण्यात आले आहे. या संपूर्ण बिलाची रक्कम ग्राहकांनी भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

Story img Loader