बारश्याच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चारजण गंभीर जखमी झाले. कबनूर (ता. हातकणंगले) येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इराप्पा िलगाप्पा पुजारी (वय ३४), लक्ष्मीबाई िलगाप्पा पुजारी (वय ६५), सुवर्णा सदाशिव हजारे व अल्लाउद्दीन तौफिक जिनाबडे (वय १७) अशी जखमींची नावे आहेत. सुदैवाने लहान बाळ व आईला काहीच दुखापत झाली नाही. या घटनेची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर येथील पंचगंगा फॅक्टरी रोडवरील सनी कॉर्नर परिसरातील कुमार केटकाळे यांच्या भाडय़ाच्या घरात इराप्पा पुजारी हे कुटुंबीयांसह राहण्यास आहेत. रविवारी त्यांच्या घरी मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता. सुमारे १० बाय १५ आकाराची पत्र्याची खोली असून याठिकाणी कार्यक्रमाची लगबग सकाळपासूनच सुरु होती. स्वयंपाकासाठी इराप्पा पुजारी यांनी गॅसचा सिलेंडर शेगडीला जोडला. मात्र शेगडी सुरु करताच रेग्युलटरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे सिलेंडरने पेट घेतला आणि त्याचा मोठय़ाने स्फोट झाला. यावेळी स्फोटामुळे सिलेंडर उडून छताला जाऊन आदळल्याने सिमेंटचे पत्रे तुटून खाली पडले. तर आगीमुळे इराप्पा यांच्यासह तेथे उपस्थित असलेली त्यांची आई लक्ष्मीबाई, शेजारी सुवर्णा हजारे व अल्लाउद्दीन हे चौघेही भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले. स्फोटाच्या आवाजामुळे भागातील नागरिकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी प्रसंगावधान राखत शेगडीसह सिलेंडर बाहेर काढून माती टाकून तो विझवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्यामुळे पुजारी यांच्या घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले आहे. सर्व जखमींना तातडीने वाहनातून प्रथम एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर सर्वाना पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. स्फोट झाला त्यावेळी लहान बाळ व त्याची आई सीमा पुजारी हे दोघेही त्या खोलीतच होते. केवळ दैवबलवत्तर म्हणून या दोघांना कसलीही इजा झाली नाही.
दरम्यान, गॅस गळतीचा असाच प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास यशवंत कॉलनी परिसरात घडला होता. पण तातडीने आग आटोक्यात आणल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

Story img Loader