इचलकरंजी येथील बावणे गल्लीत सुरू असलेले सरकारमान्य दारू दुकान स्थलांतरासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली असल्याने या दुकानाला टाळे ठोकण्याचा निर्णय १२ जूनपर्यंत स्थगित केल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी रविवारी दिली. दरम्यान, आंदोलकांच्या वतीने मीनाक्षी माळी यांनी दुकान स्थलांतराचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. बावणे गल्लीत सुरू असलेल्या सरकारमान्य दारू दुकानामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने दुकान स्थलांतराच्या मागणीसाठी २ मेपासून विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, संघटनांबरोबरच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही पाठिंबा दिला आहे. देसाई यांनी शासनाने दुकान स्थलांतराची त्वरित कार्यवाही सुरू न झाल्यास दुकानाला टाळे ठोकण्याचा इशारा मागील आठवडय़ात दिला होता. रविवारी, आंदोलनाच्या ३५ व्या दिवशी पुन्हा देसाई यांनी आंदोलकांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती दिली. या वेळी आंदोलकांनीही गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू असल्याचे सांगून कायदा हातात न घेता जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याची संधी दिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. तृप्ती देसाई यांनी दुकानाविरोधात सुरू असलेले आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांशी झालेला पत्रव्यवहार पाहून दुकान स्थलांतराची कार्यवाही सुरू झाली असल्याने दुकानाला टाळे ठोकण्याचा निर्णय १२ जूनपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला. या वेळी अरुणा शहा, सविता येलपले, संगीता लगारे, राजश्री सुतार, संदीप माळी, आनंदा सुतार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Story img Loader