कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या लेखापरीक्षणात अनियमितता आढळली आहे. संघाला खुलासा करण्याचे आदेश दिले असून त्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही. लेखापरीक्षणात अनियमितता स्पष्ट झाल्यानंतर गोकुळ वर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूल तथा दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
गोकुळ दुध संघात्तील गैर कारभाराविरोधात विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी राज्य शासनाकडे तक्रार केल्यानंतर त्याचे विशेष लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर विखे पाटील यांचे हे विधान गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे.
यावेळी विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांची विधाने म्हणजे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न असल्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हा पक्ष तळ्यात मळ्यात राहणारा असल्याने विश्वासार्हता कमी होत चालली आहे. महाविकास आघाडीचे आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ समाज माध्यमात दिसले. त्यांच्या काळात राज्य मागे पडले.
हेही वाचा… अजित पवार यांना करावी लागणार प्रतीक्षा
शेट्टी उसाकडून महसूल कडे
राज्याच्या महसूल विभागात सर्व पदासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन बदल्या केल्या जात आहेत असा आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चौकशीची मागणी केली होती. याकडे लक्ष वेधले असता विखे पाटील म्हणाले, महसूल विभागातील बदल्या प्रकाराबाबत काय घडते हे राजू शेट्टी यांनी दाखवून द्यावे. संबंधितावर तात्काळ कारवाई केली जाईल. मात्र शेट्टी हे ऊस आंदोलन सोडून महसूल आंदोलनाकडे कसे वळले, असा प्रति प्रश्न विखे पाटील यांनी केला.