थकीत कर्जापोटी बँकेने घर सील केल्याच्या नैराश्येतून कर्जदाराने बँकेतच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शुक्रवारी दुपारी केला. ही घटना गंगावेस येथील दि. कोल्हापूर अर्बन-को-ऑप. बँकेत घडली असून, राजेश पांडुरंग कावडे (वय ४२, रा. भोसले नगर, मणेर माळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळी बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर हा प्रकार घडल्याने बँक अधिकाऱ्यांसह, कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून राजेश कावडे यांच्याकडील विषारी औषधाची बाटली काढून घेतली व त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.
कावडे यांचा टेलिरगचा व्यवसाय असून त्यांनी २०१२ साली दि. कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँकेच्या गंगावेस येथील मुख्य शाखेतून घर बांधण्यासाठी दोन लाखांचे कर्ज घेतले होते. दोन वर्षांपासून कावडे यांनी या कर्जाचे हप्ते थकवले होते. ही थकबाकी ९० हजारांच्या जवळपास झाली होती. कायदेशीर परवानगीनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी २ डिसेंबर रोजी कावडे यांच्या घरी जाऊन थकीत कर्जाची मागणी केली. मात्र पसे देऊ न शकल्याने वसुली अधिकाऱ्यांनी कावडे यांचे घर सील करण्याचा निर्णय घेतला. कावडे यांची परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी घराच्या दोनच खोल्या सील केल्या व इतर खोल्या वापरण्याची परवानगी दिली. अधिकाऱ्यांनी ३ डिसेंबर रोजी या ठिकाणी जाऊन पाहिले असता कावडे यांनी बँकेने केलेले सील तोडल्याचे निदर्शनास आले. यामुळे अधिकाऱ्यांनी पुन्हा घर सील केले.
दरम्यान, शुक्रवारी कावडे यांनी बँकेत येऊन वसुली अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी आपणास आणखी दोन महिन्यांची मुदत द्यावी. आपण थकीत रक्कम भरतो असे सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी यापूर्वी तुम्हाला खूप मुदत दिली आहे. काहीतरी रक्कम बँकेत भरणे गरजेचे आहे असे सांगून सील काढण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या राजेश कावडे यांनी खिशातील विषारी औषधाची बाटली काढून बँकेतच अधिकाऱ्यांसमोर ती प्राशन केली. अनपेक्षितरीत्या घडलेल्या या प्रकाराने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनी कावडे यांच्या हातातील विषारी औषधाची बाटली काढून घेतली. मात्र काही प्रमाणात औषध कावडे यांच्या पोटात गेल्याने त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कावडे यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

Story img Loader