कोल्हापूर : चालू सन २०२३-२४ या गळीत हंगामात साखर कारखान्यांकडे गाळपासाठी येणार्या ऊसाला प्रचलित पध्दत एफआरपीनुसार प्रतिटन विनाकपात एकरकमी ३००१ रुपये देण्याचा निर्णय श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, शरद सहकारी साखर कारखाना नरंदे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ या चार साखर कारखान्यांच्या व्यवस्थापानाने घेतला असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर हंगाम समाप्तीनंतर रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला (आरएसएफ) नुसार निघणारा अंतिम दर साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने देण्यात येणार आहे.
ऊस दराच्या प्रश्नावरुन मागील महिन्याभरापासून विविध संघटनांच्या वतीने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरु आहेत. मागील फरक आणि चालू हंगामातील दर निश्चितीशिवाय साखर कारखाने सुरु होऊ देणार नाही आणि कारखान्यातून साखर बाहेर जावू देणार नाही, असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे. त्यातच नजीकच्या सीमावर्ती कर्नाटकातील कारखान्यांकडून एफआरपीनुसार ३५६४ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यातून सरासरी तोडणी व ऊस वाहतून खर्च वजा करता प्रत्यक्षात सरकारी अनुदानासह २९०० रुपये मिळणार आहेत.
हेही वाचा >>>कोल्हापुरात शाही दसऱ्याच्या सोहळ्याला दिमाखात प्रारंभ
या सर्व पार्श्वभूमीवर हातकणंगले आणि शिरोळ या दोन तालुक्यातील श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, शरद सहकारी साखर कारखाना नरंदे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ या साखर कारखान्यांनी चालू सन २०२३-२४ या हंगामात गळीतासाठी येणार्या ऊसाला प्रति मे.टन ३००१ रुपये एफआरपीनुसार विनाकपात एकरकमी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर आरएसएफनुसार निघणार अंतिम दर हा हंगाम संपल्यानंतर दिला जाणार आहे.