कामगारांना ५०० रुपये वाढ देऊन शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून सायझिंग पूर्ववत सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या संपाची तीव्रता निवळल्याचे चित्र दिसू लागले आहे. तर गुरुवार दुपारपासूनच बहुतांशी सायझिंगची धुरांडी पेटल्याचे दिसून येत होते.
सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांनी २१ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. कामगार संघटना आणि सायझिंग मालक यांच्यात चर्चेच्या फे-या होऊनही तोडगा निघाला नव्हता. अखेर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख यांनी प्रशासनाच्या वतीने बैठक घेऊन कामगारांना ५०० रुपये वाढ देऊन सायझिंग सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला अनुसरून मंगळवारी सायझिंगधारक कृती समितीच्या वतीने सहायक कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात ५०० रुपये वाढ देण्याची तयारी दर्शविली होती. तर सहा. कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी कामगार संघटनांनी हा प्रस्ताव मान्य करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.
या सर्व पार्श्र्वभूमीवर गुरुवारी शहर व परिसरातील सर्व सायझिंगधारकांची इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्या वतीने बैठक घेण्यात आली. आढावा दरम्यान कामगार स्वतःहून संपर्क साधत असल्याने शहरातील बहुतांशी सायझिंग सुरू झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उद्या शुक्रवारपासून पहाटे चार वाजल्यापासून सर्वच सायझिंग पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर वाढीसंदर्भात यापुढे कोणाबरोबरही चर्चा करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. तर सायझिंगधारक जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेऊन माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, या संदर्भात लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेचे नेते ए. बी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, कामगारांना आपापल्या सायझिंग मालकांशी चर्चा करून योग्य तडजोड करून पगारवाढ मिळत असेल व कामगारांना तो मान्य असेल तर कामावर जावे असा सल्ला दिल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा