बेळगावात मराठी भाषक रस्त्यावर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर शनिवारी बेळगावातील मराठी भाषक रस्त्यावर उतरले. कर्नाटक पोलिसांनी ६१ आंदोलकांना अटक केली असून तेथे तणावाचे वातावरण आहे. त्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने संताप व्यक्त होत आहे.

बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भगव्या ध्वजाची विटंबना करण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला होता. त्यानंतर बेळगाव शहरातील शिवप्रेमी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी चौकात ठिय्या आंदोलन करत समाजकंटकांवर कारवाई करण्याची  मागणी केली. पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना  हुसकावून लावले. 

पुतळा विटंबनेचे बेळगावात शनिवारी दिवसभर संतप्त पडसाद उमटत राहिले. बेळगाव येथील शिवाजी उद्यानातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय शिवप्रेमींनी घेतला. त्याला कर्नाटक प्रशासनाने विरोध केला. आपल्या भूमिकेवर शिवप्रेमी ठाम राहिल्याने अखेर माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेदार, माजी उपमहापौर मधुश्री पुजारी, सुधा भातखंडे, रेणू मोरे यांनी पोलिसांचे कडे तोडून अभिषेक केला. येथे गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी ६१ आंदोलकांना अटक केली आहे. त्यापैकी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या २७ जणांची हिंडलगा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. 

पोलिसांची दांडगाई 

पोलिसांनी पहाटेपासूनच आंदोलकांची धरपकड सुरू केली. युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह २७ जणांना अटक करण्यात आली. जामीन मिळू नये यासाठी १४ प्रकारची कलमे त्यांच्याविरोधात लावण्यात आली. न्यायालयासमोर उभे केले असता सायंकाळी २७ जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख नेते माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह ३४ जणांना अटक केली.

बंदचे आवाहन

खानापूर येथे उद्या, रविवारी तर सोमवारी निपाणी येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. युवा आघाडी एकीकरण समितीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून समाजकंटकांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री बोम्मई यांचे  आक्षेपार्ह विधान

सीमा भागात संतापाचे वातावरण असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे आगीत तेल ओतले गेले. शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेची घटना क्षुल्लक आहे, असे विधान मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले. त्यावर बेळगावसह सीमा भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या विधानाचा एकीकरण समितीने निषेध केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defacement of the statue of chhatrapati shivaji maharaj in karnataka akp