लोकसत्ता प्रतिनिधी
कोल्हापूर: शिये (ता.करवीर) येथील एका स्पर्धा परीक्षा केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळ उडाला. संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी हे केंद्र व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली.
शिये येथील आय.ओ.एन. परीक्षा केंद्रावर ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ओळखपत्राच्या मुद्द्यावर परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. या परीक्षा केंद्रावर नियमांची पायमल्ली होत विद्यार्थ्यांना फटका बसत आहे अशा विद्यार्थ्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. गेल्या आठवड्यात राज्य वन्य विभागाच्या स्पर्धा परीक्षा वेळी परीक्षार्थींना मोबाईल पुरवला गेल्याच्या मुद्द्यावरूनअन्य परीक्षार्थीनी आंदोलन केले होते.
हेही वाचा… कोल्हापूरातील चार खेळाडूंची प्रो-कबड्डीसाठी निवड; प्रत्येकी २० लाख
गेल्या काही दिवसापासून वनरक्षक, बँक क्लार्क, अशा परीक्षा या केंद्रास योग्य व पारदर्शी पद्धतीने हाताळता आलेल्या नाहीत. प्रत्येक परीक्षेत त्या ठिकाणी गोंधळ उडतो व विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
शिये येथील परीक्षा केंद्राच्या वारंवार तक्रारी येत आहेत. ते केंद्र बदलून शासकीय अनुदानित महाविद्यालयात शहरांमध्ये कोठेही केंद्र द्यावे. बँक क्लार्क,वनरक्षक परीक्षेमध्ये कोल्हापूर, सांगली , नागपूर सहित राज्यभर झालेल्या समूह कॉपी व गैरव्यवहारची चौकशी करावी, आदी मागण्या आज गिरीश फोंडे ,जावेद तांबोळी, आकाश भास्कर, श्रीनाथ पाटील, नेहा पाटील ,संध्या माळी,बाबासो पाटील, वीरेंद्र मालेकर, रवींद्र जाधव यांच्यासह परीक्षार्थी, पालक,ऑल इंडिया युथ फेडरेशन यांनी केली.