कोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी शिरोळ तालुक्यात संपादित करावयाच्या जमिनींना चौपट मोबदला देण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय बुधवारी मुंबई येथे एका बैठकीत घेण्यात आला. बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.

या महामार्गाच्या कामासाठी शिरोळ तालुक्यातील अंकली ते चौकाक या ३३ किमी अंतरावरील जमिनी संपादित केल्या जात होत्या. इतर भागातील शेतकऱ्यांना रेडीरेकनरपेक्षा चौपट दराने मोबदला मिळत असताना केवळ या एकाच पट्ट्यासाठी दुप्पट मोबदला दिला जाणार होता. तयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन सातत्याने आंदोलन होत आहे.

हा मुद्दा आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला होता. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकरकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे दूरभाष प्रणालीद्वारे उपस्थित होते.