कोल्हापूर : ‘अमूल’ दुध संघाच्या विरोधात कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांनी संघर्ष चालवला असताना आता त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गोकुळ दुध संघाने उडी घेतली आहे.
अमूल विरोधात राज्यातील दूध संघानी एकत्र यावे, अशी अपेक्षा गोकुळ दुध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सोमवारी राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे व्यक्त करतानाच राज्य शासनाच्या ‘महानंदा’ दुध संघाने पुढाकार घेवून नेतृत्व करण्याची गळ घातली.
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची अहमदनगर येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी भेट घेतली. उभयतांमध्ये दुध उत्पादन वाढ, दुधाची गुणवत्ता, विपणन आदी विषयावर चर्चा केली. पी. टी. शिंदे, अजित पाचुंदकर आदी उपस्थित होते.
महानंदांच्या अध्यक्षांशी चर्चा
कर्नाटक व तामिळनाडू सरकारने अमूलच्या विरोधात जशी भूमिका घेतली त्याच प्रकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी. यासाठी महानंदाने पुढाकार घ्यावा. राज्य सरकारने त्याला खंबीर साथ द्यावी, अशी अपेक्षा डोंगळे यांनी व्यक्त केली. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी या विषयाबाबत महानंदांच्या अध्यक्षासोबत चर्चा करू. लवकरच संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाईल,अशी ग्वाही दिली.