कोल्हापूर :आणीबाणीच्या विरोधात उतरून व्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना मिसा कायद्यांतर्गत अटक झाली होती. अशा कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा, अशी मागणी येथील भाजप कार्यालयात झालेल्या लोकतंत्र सेनानी संघ व भाजपच्या संयुक्त मेळाव्यात करण्यात आली.
आणीबाणीत मिसा कायद्यांतर्गत अटक झालेल्या कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यास दोनशेवर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक दीपक मराठे यांनी केले. लोकतंत्र सेनानी संघाचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतील ठरावांचा आढावा घेतला. २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत आणीबाणीत मीसा कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगलेले व्यक्ती, त्यांच्या वारसांना ‘जयप्रकाश नारायण सन्मानधन’ योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. प्र. द. गुणपुले यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्यास जिल्ह्य़ातील राशिवडे, राधानगरी, इचलकरंजी, परिते, जयसिंगपूर, कसबा तारळे, नृसिंहवाडी आदी भागातील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या वेळी प्रमोद जोशी, विश्वनाथ भुर्के, भगवान मेस्त्री, विजया शिंदे, अशोक फडणीस, स्वाती सुखदेव उपस्थित होते.