कोल्हापूर: हेर्ले (तालुका हातकणगले) येथील अनधिकृत प्रार्थनास्थळ पाडण्यास मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली. या ठिकाणी वरिष्ठ महसूल व पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. हे काम शांततेत सुरू आहे.
हेर्ले गावामध्ये संजय नगर भागात शिवजयंतीच्या निमित्त डिजिटल फलक उभारण्यात आला होता. तो अज्ञाताने फाडला होता. त्यावरून गेल्या आठवड्यात गावातील महिला, नागरिक, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला होता.
आणखी वाचा- राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी; बारसू प्रकल्पाबाबत वक्तव्य करण्यास बंदी
तसेच परिसरातही या प्रकरणावरून आंदोलन सुरू झाली होती. तर याप्रकरणी पोलिसांनी रियाज मुजावर या संशयताला पकडले होते. दरम्यान हे प्रकरण सुरू असतानाच गावातील एका अनधिकृत, बेकायदेशीर प्रार्थना स्थळाचा विषय पुढे आला. प्रार्थनास्थळ बांधण्याचे काम अजून सुरू आहे. मात्र तेथे प्रार्थना केली जात असल्याने वाहतुकीला, पादचाऱ्यांना अडथळा होत आहे, अशा तक्रारी होत्या. त्याची कुजबूज सुरू होती. मात्र डिजिटल फलक पाडण्याच्या प्रकरणावरून अनधिकृत प्रार्थना स्थळाचा विषय पुढे आला. त्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आग्रहीपणे होऊ लागली होती.
याची दखल घेऊन आज सकाळी विनापरवाना बांधण्यात येत असलेले प्रार्थना स्थळ पाडण्यास सुरुवात झाली. तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैजनाथे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ महसूल व पोलिस अधिकारी घटनेवर लक्ष ठेवून आहे. तथापि गावात अद्यापही शांतता आहे.