लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी गुरुवारी नागरिकांनी महानगरपालिकेवर जोरदार निदर्शने केली. प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
गेली साडेतीन वर्षे कोल्हापूरमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू असून शहरातील नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. नागरिकांनी शेकडो निवेदने, संस्था -संघटना, राजकीय पक्षांची आंदोलने होऊन सुद्धा महानगरपालिका प्रशासन ढिम्मच आहे. या प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे यांनी ११ जून रोजी लाक्षणिक उपोषण केले होते.
आणखी वाचा-शाहू जयंतीच्या मिरवणुकीला रोखताच कसे? हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना खडसावले; व्हिडीओ व्हायरल
मागील आठवड्यात मुक्त संवाद आयोजित करून नागरीकांच्या तक्रारी व कोल्हापूरच्या विकासासंबंधीच्या संकल्पना एकत्रित केल्या होत्या. त्यावेळी आलेल्या शेकडो तक्रारींच्या निराकरणासाठी आज महानगरपालिकेवर निदर्शने करण्यात आली. घोषणांचे फलक घेऊन नागरिक या आंदोलनात सामील झाले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, डॉ.अश्विनी माळकर, प्रा. नीलिमा व्हटकर, जयंत गोयाणी, प्रताप देसाई यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली व विविध अडचणींचा पाढा वाचला.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी आंदोलकांनी महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागातील गलथान कारभाराची माहिती दिली. या समस्यांची निर्गत करण्यासाठी प्रत्येक विभागासोबत आंदोलकांची वेगळी बैठक लावण्याचे मेनी करण्यात आले.