तीन महिन्यांत चौघांचा मृत्यू
इचलकरंजी शहरात डेंग्यूचा फैलाव वाढू लागला असून गत तीन महिन्यांच्या कालावधीत चौघांचा मृत्यू झाल्याने नागरिकातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्याने गुरुवारी तातडीची बठक होऊन डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. त्यानुसार घरोघरी सर्वेक्षण, औषध फवारणी, रक्ताची चाचणी व औषधोपचार करण्याचा निर्णय आयजीएम हॉस्पिटलमध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या बठकीत घेण्यात आला.
डेंग्यूचा फैलाव वाढत चालला असून शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. महेश खलिपे यांनी या प्रश्नी गांभीर्याने घेण्याबाबत नगरपालिकेला खडसावले. त्यामुळे वरातीमागून घोडे अशी अवस्था असणाऱ्या नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी आयजीएम रुग्णालयात बठक घेतली. डेंग्यूवर उपाययोजना करण्यासाठी झालेल्या चच्रेत दोन व्यक्तींचे एक पथक अशा पन्नास पथकांद्वारे दररोज शंभर घरांचा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सलग पंधरा दिवस ही मोहीम राबविण्यात येणार असून घरातील पाणीसाठ्यांची तपासणी, डेंग्यूचे डास आढळल्यास टेमीफॉस या औषधाचा वापर करणे, तसेच नागरिकांची तपासणी केली जाणार असून संशयित रुग्ण आढळल्यास त्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील. शहरात सर्वच घरांमध्ये औषध फवारणी करण्यात येणार आहे.
शहरातील सर्व सायिझग, प्रोसेस व अन्य मोठ्या उद्योगांच्या ठिकाणच्या पाणीसाठ्यांचीही स्वतंत्र पथकाद्वारे पाहणी केली जाणार आहे. शहरातील कचरा कंटेनरसह भागाभागात स्वच्छता मोहीम गांभीर्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्याची व्यवस्था आयजीएम रुग्णालयात करण्यात आली असून तेथील अहवालानंतर तातडीने योग्य ते उपचार केले जातील.

Story img Loader