कोल्हापूर : कोल्हापुरात लवकरच ‘आयटी पार्क’ उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेंडा पार्क येथे होणाऱ्या या ‘आयटी पार्क’साठी ३४ हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत दिले. ही जागा कृषी विद्यापीठाची असल्याने त्यांना शेती, शिक्षण, संशोधन याकरिता पर्यायी जागा देण्यासाठी ६० ते १०० हेक्टर जागेचा शोध दहा दिवसांत घ्यावा, अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री पवार हे गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा आमदार अमल महाडिक यांनी त्यांना कोल्हापुरात ‘आयटी पार्क’ सुरू करण्यासाठी जागा देण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले आदी उपस्थित होते.

या बैठकीत शेंडा पार्क येथे या ‘आयटी पार्क’साठी ३४ हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात यावी, असे आदेश पवार यांनी दिले. ही जागा कृषी विद्यापीठाची असल्याने त्यांना शेती, शिक्षण, संशोधन याकरिता पर्यायी जागा देण्यासाठी ६० ते १०० हेक्टर जागेचा शोध दहा दिवसात घ्यावा, अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.

‘आयटी पार्क’ला गती – महाडिक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे कोल्हापूर ‘आयटी पार्क’ होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल; त्याला गती येईल, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली.

आशा उंचावल्या

कोल्हापूर शहरात आयटी पार्क व्हावा यासाठी गेली दोन दशके प्रयत्न सुरू आहेत. सध्या एक छोटेखानी आयटी पार्क आहे. तथापि कोल्हापुरात विस्तृत प्रमाणात आयटी पार्क व्हावा अशी मागणी आहे. त्याकरिता १०० एकर जागा मिळावी अशीही मागणी अनेकदा झाली आहे. याकरिता विविध पक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. शासनाकडूनही आयटी पार्क होण्याबाबत अनेकदा घोषणा झाली आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयटी पार्कसाठी प्रत्यक्ष जागा देण्याचे निर्देश दिले असल्याने आशा उंचावल्या आहेत.