लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ऐतिहासिक किल्ले पन्हाळा गडावर तटबंदीच्या बुरुजाची नासधूस करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पर्यटकांकडून झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे, तसा पर्यटकांचा ओघ किल्ले पन्हाळगडाच्या दिशेने येऊ लागला आहे. येथील अनेक ऐतिहासिक ठिकाणी पर्यटकांचा राबता वाढला आहे. तथापि काही हुल्लडबाज पर्यटनाचा आनंद घेण्याऐवजी ऐतिहासिक वास्तूची नासधूस करून हानी पोहचवताना दिसतात. पुसाटी तटबंदीचे दगड विखरून टाकल्याचे दिसून आले आहे.
पर्यटकांकडून असा प्रकार झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. बुरुजाच्या जवळ ताणतीर व निमजगाव परिसरात दोन पोलीस चौक्या असूनही हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी अधूनमधून पोलिसांनी गस्त घातली, तर अशा आक्रस्ताळी कृत्यांना आवर बसेल, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुरातत्त्व विभागाचे अधिकारी विजय चव्हाण यांनी, तटबंदीचे खाली पडलेले दगड वर आणून दुरुस्ती करवून घेणार असल्याचे म्हटले आहे. गडाची नासधूस करणाऱ्या पर्यटकांनी गडावर येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.