कोल्हापूर : भाजपाचे संघटन पर्व सुरू असताना दीड कोटी सदस्य करण्याचे उद्दिष्ट अवघ्या दहा लाखांनी कमी आहे. ते लवकरच पूर्ण करून भाजप राज्यातील सर्वांत मोठा पक्ष होईल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर भाजपा जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर या जिल्हाध्यक्षांनी फडणवीस यांचे स्वागत केले.भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी याप्रसंगी दिल्या.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रचंड यशामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. लोकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बूथ अध्यक्ष ते भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी कायमच सक्रिय असतो. कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील रहावे.प्रत्येक कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आव्हान त्यांनी केले. जानेवारी महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व सुरू झाले आहे या अंतर्गत प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी तसेच बूथ समिती, जिल्हा समिती इत्यादी पूर्ततेसाठी असेच अखंडपणे कार्यरत राहावे.
फडणवीस यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा, संघटनांची निवेदने स्वीकारली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, प्रदेश सचिव महेश जाधव, माजी आमदार प्रकाश आवाडे तसेच अमल महाडिक, राहुल आवाडे, शिवाजी पाटील आदी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरडकरबाबत विरोधकांचे राजकारण
प्रशांत कोरडकर प्रकरणात इंडिया आघाडीकडून राजकारण करण्यात येत आहे, असा आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पोलिसांनी याप्रकरणी कोरटकर विरोधात त्वरित गुन्हा दाखल केला आहे. अटकेला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पोलिसांनी उच्च न्यायालयात अपील करून कोरटकरच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली आहे. काही लोकांना या प्रकरणाचे राजकारण करायचे आहेत; त्यांना ते करू देत. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता मारहाण करताना आढळला आहे. यावर बोलताना फडणवीस यांनी याबाबत माहिती घेऊन बोलणार, अशी प्रतिक्रिया दिली.