कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड ) या संत बाळूमामा देवालय तीर्थस्थळी रविवारी भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. सुमारे चार ते पाच तास वाहने ठप्प झाली होती. वाहतूक नियोजनाच्या सावळ्या गोंधळाबद्दल भाविकांतून नाराजी व्यक्त केली जात होती.
आदमापूर येथे संत बाळूमामा देवालयाच्या दर्शनासाठी अमावस्येला मासिक यात्रा भरत असते. दक्षिण महाराष्ट्र -उत्तर कर्नाटकतून भाविकांची रीघ लागत असते. मार्चच्या अखेरीस बाळूमामाची भंडारा यात्रा पार पडली तेव्हा प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन केले होते. हा मुख्य सोहळा आवरल्यानंतर पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या डोके वर काढू लागली आहे. आज तर तीन किमीच्या अंतरावर दुतर्फा वाहनांची रीघ लागली होती. वाहने जागीच ठप्प झाल्याने भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
मंदिराजवळ उड्डाणपूल उभारला असला तरी वाहतूक कोंडीची समस्या दूर होताना दिसत नाही. भाविक निवासाची भव्य इमारत बांधली आहे. या परिसरात स्वतंत्र भव्य वाहनतळ उभारण्याची गरज आहे. जमिनीच्या किमती भडकल्या असल्याने जमीन खरेदी करून वाहनतळ उभारणे हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, स्थानिक समिती, ग्रामपंचायत यांच्यासमोर एक आव्हान आहे.राधानगरी-गारगोटी मार्गे निपाणी मार्गावर मुदाळ तिठ्ठा, वारके सूतगिरणी, वाघापूर, निढोरी मार्गे एकेरी वाहतूक पर्यायाचा मार्ग अवलंबतानाच रस्ता रुंदीकरणाकडे आमदार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.