कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरात करोना काळात गाभाऱ्यात जाऊन दर्शनावर घातलेली बंदी उठवत आता गर्दीचे दिवस वगळून अन्य दिवशी गाभाऱ्यातील दर्शन पुन्हा सुरू केले आहे. दरम्यान मंदिर परिसराचा जमिनीवर विकास करण्यात अडचणी येऊ लागल्याने आता भूमिगत कामाचा मार्ग चोखाळण्याच्या निर्णयाप्रत शासन आले आहे. मंदिरातील दर्शन रांगा, वाहनतळ, विद्युत वाहिन्या यांचे काम भूमिगत केले जाणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले.
हेही वाचा >>> कोल्हापूर: चंदगड तालुक्याचे नाव झाले रामपूर ; तांत्रिक घोळाने प्रशासकीय काम खोळंबळे
मंदिर परिसरातील स्वच्छतागृह व चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर केसरकर माध्यमांशी बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.
उद्या (मंगळवार) पासून गर्दीचे दिवस वगळून भाविकांना गाभाऱ्यातून महालक्ष्मीचे दर्शन घेता येणार आहे. करोनाची साथ आल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. आता साथ ओसरल्याने तीन वर्षांनंतर गाभाऱ्यातील दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, सामाजिक विषयाशी निगडीत जुन्या वास्तू व ठिकाणांची दुरुस्ती, डागडूजी सुरु आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेले कोल्हापूर आधुनिकपणा न आणता ऐतिहासिक वारसा कायम ठेवून येत्या काळात उभे करणार असल्याचे आश्वासन केसरकर यांनी यावेळी दिले.