शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची झुंबड उडाली असून शुक्रवारी नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी मंदिरात गर्दीचा उच्चांक झाला. दीड लाखांहून अधिक भाविकांनी आज श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. भवानी मंडप ते भाऊसिंगजी रोडपर्यंत दर्शन रांगा लागल्या होत्या. पहाटेपासूनच दर्शनसाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. मंदिराच्या चारही दरवाजांवर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. सकाळी विशेष पोलिस महासंचालक माधवराव सानप यांच्या हस्ते शासकीय अभिषेक घालण्यात आला. या वेळी देवस्थान समितीचे सदस्य सुनील असवलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी परराज्यातून लाखो भाविक येत असतात. यंदाही या पर्यटकांच्या गर्दीने अडीच लाखाचा टप्पा गाठला आहे. शिवाय आज शनिवार आणि रविवार धरून सुट्टी, ललिता पंचमी, त्र्यंबोली यात्रा या सर्वच धार्मिक विधी पाहण्यासाठी गर्दी उच्चांक गाठणार आहे. रात्री साडेनऊला पालखी सोहळा झाला. सुवर्णपालखी ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या पालखी आणि चवऱ्यांचा उपयोग पालखी सोहळ्यात करण्यात आला होता. ट्रस्टच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, समित शेठ, अवनी शेठ, महावीर गाठ, चंदुभाई ओसवाल यंच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने हिला जाणारा लाडूचा प्रसाद भाविकांना उपलब्ध झाला.
उद्योगपती अदानींनी घेतले दर्शन
गुजरात येथील प्रख्यात अदानी ग्रुप इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक राजेश अदानी यांनी सपत्नीक अंबाबाईचे दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर देवस्थान समितीतर्फे अदानी दांपत्याचा सत्कार करण्यात आला.
आजची पूजा गजलक्ष्मी रूपात
आज श्री अंबाबाईचा वार. शुक्रवार असल्याने देवीची पूजा गजलक्ष्मी रूपात बांधण्यात आली होती. सौभाग्य आणि संपूर्ण कुटुंबाला ऐश्वर्य सुख, समाधान मिळावे यासाठी गजलक्ष्मीची उपासना केली जाते. असा या रूपाचा महिमा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा