दयानंद लिपारे
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तुलनेने राजकीय शांत असताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मात्र घटना, घडामोडींना वेग आला आहे. या लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांचा कल भाजपकडे वाढला आहे. या मतदारसंघातून लढण्याचा मनसुबा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने जनसंपर्क वाढवला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आजोबा ते नातू असा माने घराण्याचा प्रवास असून त्यामध्ये निवेदिता माने यांचाही नामोल्लेख आहे. मधल्या काळात काँग्रेसकडून कल्लाप्पाण्णा आवाडे आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे प्रत्येकी दोनदा विजयी झाले. लोकसभा निवडणुकीचे वारे होऊ लागले असताना वेगवेगळे प्रवाह दिसून येत आहेत. त्यामुळे आतापासूनच या वेळेची लढत चुरशीने होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजपकडून तयारी
गेल्या वेळी शिवसेनेकडून निवडून आलेले धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या छावणीत गेले. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने खासदारांचा इचलकरंजी शहर आणि मतदारसंघाशी संपर्क नसल्याची तक्रार करायला सुरुवात केली. अशातच शिंदे गट आणि इचलकरंजी भाजपमधील मतभेद ताणले गेले. या वादाची परिणती म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपकडे द्यावा, अशी मागणी पक्षाकडून पुढे आली. त्यातूनच माजी आमदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार या चर्चेनेही जोर धरला.
सदाभाऊंना लोकसभेचे वेध
धैर्यशील माने यांनी भाजपशी घरोबा वाढवला असताना या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सदस्य सदाभाऊ खोत यांनी उमेदवारीचा दावा केला आहे. ऊस निर्यात बंदीविरोधात आपल्याच सरकारला घरचा आहेर दिल्यानंतर खोत यांनी मंत्री पातळीवर बैठका घडवून आणून निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. या माध्यमातून प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी आंदोलनाचे फलित म्हणून लोकसभा निवडणुकीकडे लक्ष पुरवायला सुरुवात केली आहे. धैर्यशील माने यांचा प्रचार करून त्यांना २० दिवसांत खासदार केले. आता त्यांनी आमचा पैरा फेडला पाहिजे, असे म्हणत माने यांनी थांबावे आणि आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी खोत यांनी स्वत:हून केली आहे. खोत यांना विधान परिषदेची पुन्हा संधी दिसत नाही. विधानसभेसाठी तूर्तास मतदारसंघ नाही. अशा वेळी खोत यांनी सोयीच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर दावा केला असून या निमित्ताने धैर्यशील माने यांना शह देत असताना भाजपलाही विचार करण्यास भाग पाडले आहे.
शेट्टींची मोर्चेबांधणी
ऊस निर्यातबंदीच्या विषयावरून राजू शेट्टी यांनी पहिली विरोधाची आरोळी ठोकली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाला हात घातला. दुसरीकडे गेल्या हंगामातील उसासाठी एफआरपी अधिक प्रतिटन ४०० रुपये मिळावेत यासाठी बहुतेक साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे. ही रक्कम दसरा – दिवाळीपूर्वी न मिळाल्यास कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे. याकडे कारखानदारांनी दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तयारी शेट्टी यांनी केली आहे. या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या ऊस आंदोलनात उतरण्याच्या तयारीत बाहेत. ऊस आंदोलनातच शेट्टी यांची प्रतिमा शेतकरी नेता अशी निर्माण झाली होती. आता शासन आणि साखर कारखाना त्यांना आंदोलनाची संधी देणार का, हा प्रश्न आहे. तर शेट्टी यांनी ऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोर्च बांधणी सुरू केली असून हा लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा हा भाग असल्याचे मानले जात आहे.
मानेंच्या हाती कमळ ?
इचलकरंजी भाजपकडून आपल्या विरोधात टीकेचे बाण सोडले जात असल्याचे पाहून खासदार धैर्यशील माने सावध झाल्याचे दिसतात. त्यांनी थेट भाजपशीच हातमिळवणीचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी हाळवणकर यांच्याशी संपर्क वाढवला आहे. शिवाय, इचलकरंजी भाजप कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमास निमंत्रित नसतानाही आवर्जून उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. या माध्यमातून त्यांनी भाजपशी अधिकच जवळीक वाढवली आहे. शिंदे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना ती जड जाण्याची शक्यता वेगवेगळय़ा सर्वेमधून वर्तवली गेली आहे. या पार्श्वभूमीवर धैर्यशील माने यांचे बदलते भाजपधार्जिणे धोरण बरेच काही स्पष्ट करणारे आहे.