श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अलीकडेच काँग्रेस नेते सतेज ( बंटी ) पाटील यांच्या गटातील २७ उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं होते. त्यानंतर कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखे लढा, बावड्याचा पाटील कधी मागे पडणार नाही, असं आव्हान बंटी पाटील यांनी महाडिक गटाला दिलं होतं. याला आता धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय महाडिक म्हणाले, “समोर उभारणाऱ्यांना निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण, बंटी पाटलांचा एकही टन ऊस कारखान्यात येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी सहभाग घ्यायला नको होता. ते सगळीकडे सांगत आहे, मी ९६ कुळी पाटील आहे. सर्वजण ९६ कुळी पाटील आहेत. पण, ते मनोरुग्ण पाटील आहेत.”

हेही वाचा : दादा भुसेंची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, राहुल गांधींशी तुलना करत म्हणाले, “छोटे युवराज…”

“फक्त विरोधासाठी विरोध, द्वेषाने पछाडलेले, सूडबुद्धीने महाराष्ट्रात एकमेव नेता कोण राहिला असेल, तर हे मनोरुग्ण पाटील आहेत. बंटी पाटील कोल्हापुरला लागलेला शाप आहे. १५ वर्षे आमदार, ८ ते ९ वर्षे मंत्री होते. त्यांनी कोल्हापुरचा काय विकास केला? सतेज पाटील कोल्हापुरला लागलेला शाप नाहीतर शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळही आहेत,” अशी घणाघाती टीका धनंजय महाडिक यांनी केली आहे.

“ही निवडणूक एकतर्फी होत, बंटी पाटलांच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्क जप्त होणार आहे,” असं भाकीतही धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : “अख्खा काँग्रेस पक्ष आपल्या पाठिशी…”, फडणवीसांच्या विधानावर नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

“तुमची भाषा मग्रुरीची आणि खोटारडेपणा हे तुमचं सूत्र”

माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, “महादेवराव महाडिक यांनी २७ वर्षे हा कारखाना सभासदांचा ठेवला. कारखान्याचा ७/१२ छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या नावाने आहे. बंटी पाटलांनी कोणाचे तरी ऐकून तोंडावर पडू नये. आम्ही ३७ वर्षाचा अहवाल तुम्हाला दाखवतो, तुम्ही एक वर्षाचा दाखवा. तुमची भाषा मग्रुरीची असून, खोटारडेपणा हे तुमचं सूत्र आहे,” असं टीकास्र अमल महाडिक यांनी सोडलं.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay mahadik attack satej patil over chhatrapati rajaram maharaj sugar mill election ssa